सायकलद्वारे पर्यावरण जनजागृतीचा संदेश देणारी २०० किमी. सायकल स्पर्धा संपन्न

November 24,2020

वाशीम : २४ नोव्हेंबर - गेल्या चार वर्षापासून ब्रेवेट स्पर्धेच्या माध्यमातून लोकांना सायकलव्दारे पर्यावरण जनजागृतीचा संदेश देणार्या वाशीम सायकलस्वार ग्रुप व वाशीम रॉदीनर ग्रुपच्या वतीने आयोजीत 200 किमी सायकल स्पर्धेमध्ये अमरावती, आर्णी, पुसद आणि वाशीम जिल्ह्यामधून तब्बल 29 सायकलप्रेमींनी सहभाग घेतला. या स्पर्धकांमध्ये विविध सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील अधिकार्यांसह 11 पोलिस आणी एक महिला पोलिस उस्फुर्तपणे सहभागी झाले होते.

22 नोव्हेंबर रोजी सकाळी 4 वाजता स्थानिक पाटणी चौक येथून स्पर्धेला सुरुवात झाली. सागर रावले व अधिराज राऊत यांनी हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेचा प्रारंभ केला. साडे तेरा तास अशा निर्धारीत वेळेत वाशीम, बिटोडा भोयर, मंगरुळनाथ, कारंजा, खेर्डा, धनज व परत वाशिम असे 200 कि.मी. चे अंतर स्पर्धकांनी वेळेच्या आत पुर्ण केले. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे 29 सायकलपटुंपैकी 3 जणांनी या स्पर्धेत विनागेअरची सायकल वापरुन इतर महागड्या गेअरच्या सायकलस्वारांसोबत निर्धारीत वेळेत स्पर्धा पार पाडली. यामध्ये पोलिस कर्मचारी सुनिल मुंदे, नगरसेवक राहुल तुपसांडे, उद्योजक नारायण ढोबळे व कृष्णा येथील राजेश जाधव यांचा समावेश होता. सहभागी सायकलपटूंनी निर्धारीत वेळेच्या एक तास अगोदर स्पर्धा समाप्त केली. स्पर्धेत ठिकठिकाणी या सायकलस्वारांचे नागरीकांकडून स्वागत करण्यात आले.

 पुढील 100 कि.मी. ची ब्रेवेट पॉप्युलर स्पर्धा 6 डिसेंबर रोजी वाशीम येथे होणार असून, या स्पर्धेत स्पर्धकांनी भाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ब्रेवेट सायकल स्पर्धेसाठी स्पर्धक देशभरातील कुठलेही ठिकाण निवडु शकतो. या सायकल स्पर्धेचा पुर्वनिर्धारीत कार्यक्रम इंटरनेटवर उपलब्ध असतो. त्याअंतर्गत स्पर्धक इंटरनेटवरच आपल्या नावाची नोंदणी करु शकतो, असे आवाहन स्पर्धेचे आयोजन चेतन शर्मा यांनी केले.