प्रकल्पाच्या पाण्यासाठी बेमुदत उपोषण करण्याचा दिला इशारा

November 24,2020

बुलढाणा : २४ नोव्हेंबर - रब्बीच्या पिकांसाठी पाण्याची नितांत गरज असून खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी विनाविलंब कालव्यात सोडा अन्यथा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष तेजराव मुंढे यांनी दिला आहे. कार्यकारी अभियंता खडकपूर्णा कार्यालय देऊळगाव राजा यांना याविषयी निवेदन देण्यात आले. चोखासागर खडकपूर्णा प्रकल्प 100 टक्के भरलेला आहे. सध्या रब्बीची पेरणी सुरु आहे. गहू, हरभरा, ज्वारी आदी पिक पेरणीचा काळ संपत चालला असताना कालव्यात पाणी सोडण्याच्या कोणत्याही हालचाली दिसत नाही. पेरणीचा काळ निघून गेल्यावर पाणी सोडणार का असा प्रश्न शेतकर्यांनी उपस्थित केला आहे.

 दिवाळीनंतरही पाटबंधारे विभागाच्या वतीने कुठलेही नियोजन करण्यात आले नाही. प्रकल्प अधिकार्यांनी 26 नोव्हेंबरपर्यंत कालव्यात पाणी सोडले नाही तर लाभार्थी शेतकरी सोबत घेऊन शेतकरी संघटनेच्या वतीने 1 डिसेंबर रोजी कार्यकारी अभियंता खडकपूर्णा प्रकल्प कार्यालय देऊळगाव राजा येथे बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा तेजराव मुंडे यांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी बुलडाणा, कार्यकारी अभियंता बुलडाणा, तहसिलदार व पोलीस निरीक्षक देऊळगाव राजा यांना देण्यात आल्या आहेत. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.