दोन दुचाकीच्या धडकेत दुचाकी चालकांचा मृत्यू

November 24,2020

अमरावती : २४ नोव्हेंबर - चांदूर रेल्वे - अमरावती मार्गावरील सावंगा फाट्याजवळ दोन दुचाकींच्या समोरासमोरील धडकेत दोन्ही दुचाकीचालकांचा मृत्यू झाला असून दोघे किरकोळ जखमी झाल्याची घटना दुपारी ३.३0 ते ४ वाजताच्या सुमारास घडली. अनिल सुधाकर मेश्राम  (वय ३१ वर्ष) रा. शिवणी रसुलापुर व आशिष चंद्रकांत काकडे (वय ३५ वर्ष) रा. रामनगर, वर्धा असे मृतकांची नावे आहेत. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिल सुधाकर मेर्शाम हे आपल्या डिस्कव्हर दुचाकी क्रमांक एमएच २७ एडब्ल्यू १४५७ ने अमरावती कडे जात होते. तर विरुद्ध दिशेने अमरावतीवरून चांदूर रेल्वेकडे आशिष चंद्रकांत काकडे (वय ३५ वर्ष) हे शाईन दुचाकी क्रमांक एमएच ३२ बी ४६0७ ने पत्नी राणी अशिष काकडे (वय २८) व मुलगा शिवांश आशिष काकडे (वय ३) सोबत येत होते. या दोन्ही दुचाकींची सावंगा फाट्यावर समोरासमोर जबर धडक झाली. यामध्ये दुचाकीचालक अनिल मेर्शाम यांचा जागीच मृत्यु झाला. तर आशिष काकडे यांचा अमरावती येथील रूग्णालयात मृत्यू झाला. याशिवाय राणी काकडे व शिवांश काकडे हे किरकोळ जखमी झाले आहे. घटनेची माहिती मिळताच प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी पुनम पाटील व ठाणेदार मगण मेहते हे घटनास्थळी पोहोचले होते. यानंतर चांदूर रेल्वे पोलिस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबल श्रीकृष्ण सिरसाट व पो. कॉ. प्रफुल्ल माळोदे यांनी घटनास्थळी पोहचून घटनेचा पंचनामा केला. अनिल मेर्शाम यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी करिता चांदूर रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता. या घटनेचा पुढील तपास चांदूर रेल्वे पोलिस करीत आहे.