चंद्रपुरात पकडली १२ लाखाची चोरटी दारू

November 24,2020

चंद्रपूर : २४ नोव्हेंबर - पोलिसांना मिळालेल्या गुप्त सूचनांचे आधारावर वरोरा पोलीस टीमने  रात्रोला पोलीस स्टेशन हद्दीत येणार्या मौजा बोपापूर शेत शिवारात छापा मारला. झडती दरम्यान सुमारे १२ लाख २0 हजार रूपयांचे १२२ देशी दारूचे बॉक्ससह १ लाख २0 हजार रुपयांचे अन्य साहित्य असा एकूण १३ लाख ४0 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

जिल्ह्यात दारूबंदी असतानाही परराज्यातून व सीमावर्ती जिल्ह्यातून तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारू येत आहे. वरोरा पोलिस स्टेशन हद्दीत येणार्या मौजा बोपापूर शेत शिवारात मोठ्या प्रमाणात दारूसाठा लपवून ठेवल्याची गुप्त सूचना पोलिसांना मिळाली. सूचनेनुसार उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय व पोलिस स्टेशन वरोर्याच्या संयुक्त पथकाने रविवारी रात्रीला १ वाजताच्या सुमारास बोपापूर जवळील शेत शिवारात धाड टाकली. झडती दरम्यान शेत शिवार परिसरात ९0 मिलीच्या बाटल्या भरलेले १२२ बाक्स आढळून आले. बाजारात यांची किंमत सुमारे १२ लाख २0 हजार रुपये सांगण्यात येते. 

या सोबत पोलिसांनी १ लाख रुपये किंमतीची २ मोटार सायकल, २0 हजार रुपयांचे २ मोबाईल फोन असा एकूण १३ लाख ४0 हजार रुपयाचा माल जप्त केला. दरम्यान पोलिसांनी या संदर्भात पोलिस स्टेशन वरोरा येथे अपराध क्र.१0५७/ २0 कलम(६५) ई (अ), ८३ मदाका अन्वये गुन्हा नोंद करून आरोपी शेखर जंगोनी (४५) शेख रिजवान शेख रसूल दोन्ही रा. खांबाडा यांना अटक केली. 

ही कारवाई पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश पांडे, पोलिस निरीक्षक दीपक खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजकीरण मडावी, सपोनि राहूल किटे, सपोनि चवरे, पोलिस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे, नापोका दीपक दुधे, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पोशि जावेद यांनी केली. अधिक तपास वरोरा पोलीस करीत आहे.