तेजस्वी सूर्यांनी केली ओवैसी बंधूंवर टीका

November 24,2020

हैद्राबाद : २४ नोव्हेंबर - भारतीय जनता पार्टीचे नेते आणि खासदार तेजस्वी सूर्या यांनी सोमवारी (२३ नोव्हेंबर २०२०) ओवेसी बंधूंवर कठोर शब्दांमध्ये टीका केली. ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एआयएमआयएम विरुद्ध भाजपा अशी लढत पहायला मिळत आहे. भाजपाने या निवडणुकींसाठी आपली संपूर्ण ताकद लावली आहे. एक डिसेंबर रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या आधीच भाजपाच्या सूर्या यांनी एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि त्यांच्या भावावर निशाणा साधला आहे. सूर्या यांनी ‘असदुद्दीन आणि अकबरुद्दीन हे विकासाबद्दल बोलत आहेत हे खूपच हस्यास्पद आहे,’ असं म्हटलं आहे.

“ओवेसी बंधू कधीच जुन्या हैदराबादचा विकास करणार नाही. ते केवळ रोहिंग्या मुस्लिमांना भारतात प्रवेश देतील. ओवेसींना मिळणारं प्रत्येक मत हे भारताच्या विरोधात पडणार मत असेल. असदुद्दीने ओवेसी हे विक्षिप्त इस्लाम, विभाजनवाद आणि टोकाच्या विचारसरणीच्या गोष्टी करतात याच गोष्टी मोहम्मद अली जिन्नाही करायचे,” अशा शब्दांमध्ये सुर्या यांनी ओवेसी बंधुंवर निशाणा साधला.

असदुद्दीन ओवेसींनी काही दिवसांपूर्वीच भाजपावर टीका करताना या निवडणुकीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरु असल्याचा आरोप केला होता. हैदराबादमध्ये पूरजन्य परिस्थिती होती तेव्हा केंद्राने काय केलं असा सवालही ओवेसी यांनी केंद्र सरकारला विचारला होता. “तुम्ही भाजपा नेत्यांना रात्री झोपेतून उठवलं आणि काही विचारलं तर ते लोकं ओवेसी गद्दार, दहशतवादी आणि पाकिस्तानी आहे, असंच सांगतील. मात्र भाजपाने हे सांगितलं पाहिजे की मागील वर्षी तेलंगण खास करुन हैदराबादला त्यांनी कोणती आर्थिक मदत केली? हैदराबादमध्ये पूर आला तेव्हा मोदी सरकारने काय मदत केली? त्यावेळी त्यांनी काहीच मदत केली नव्हती म्हणून आता हा धार्मिक मुद्दा निर्माण केला जात आहे,” असा टोलाही ओवेसींनी लगावला होता.

हैदराबाद पालिका निवडणुकीमध्ये वर वर दोन पक्षांमधील लढाई दिसत असली तरी एआयएमआयएम, भाजपाबरोबरच टीएमसीही या निवडणुकीमध्ये चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे. या निवडणुकीचे निकाल ४ डिसेंबर रोजी लागणार आहेत.