लव्ह जिहादप्रकरणी दाखल केलेला गुन्हा न्यायालयाने केला रद्द

November 24,2020

अलाहाबाद : २४ नोव्हेंबर - देशात लव्ह जिहादचा मुद्दा ऐरणीवर आलेला असून, उत्तर प्रदेश सरकारनं अशा घटनांना आळा घालण्यासाठी कायदा करण्याचीही घोषणा केली आहे. मात्र, अलहाबाद न्यायालयानं दिलेल्या महत्त्वपूर्ण निकालानं योगी सरकारला झटका बसला आहे. आम्ही जोडप्याकडे हिंदू-मुस्लीम म्हणून बघत नाही, असं सांगत न्यायालयाने प्रियंका खरवार-सलामत अन्सारी प्रकरणी दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द केला आहे.

योगी आदित्यनाथ सरकार उत्तर प्रदेशात लव्ह जिहादविरुद्ध कायदा करण्याच्या तयारीत असतानाच अलहाबाद उच्च न्यायालयानं एका प्रकरणात महत्त्वाचा निकाल दिला आहे. सलामत अन्सारी यांनी अलहाबाद उच्च न्यायालयात धाव घेत आपल्याविरोधातील गुन्हा रद्द करण्याची मागणी केली होती.

सलामत अन्सारी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयानं मनासारखा जोडीदार निवडण्याचा अधिकार मूलभूत असल्याचं स्पष्ट केलं. “आम्ही प्रियंक खरवार आणि सलामत अन्सारी यांना हिंदू-मुस्लीमच्या नजरेतून बघत नाही. उलट ते दोघंही स्वःतच्या मर्जीने आणि एका वर्षाहून अधिक काळापासून आनंदानं शांततेत जगत आहेत. न्यायालय आणि घटनापीठं भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २१ नुसार व्यक्तीच्या जगण्याचा अधिकार आणि स्वातंत्र्य कायम ठेवण्यासाठी कटिबद्ध आहेत,” असं न्यायालयानं सांगितलं.

 “कायदा कोणत्याही व्यक्तीला आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत राहण्याची परवानगी देतो. मग त्या व्यक्ती एकाच धर्मातील असो, वा वेगवेगळ्या धर्माच्या. वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अधिकारासाठी स्वाभाविक आहे. एका वैयक्तिक संबंधामध्ये हस्तक्षेप करणं म्हणजे व्यक्तीच्या आवड स्वातंत्र्याच्या अधिकारावर गंभीर आक्रमण केल्यासारखंच होईल,” असं सांगत न्यायालयानं सलामत अन्सारी यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द केला.