२५ हजार कोटींच्या जमीन घोटाळ्यात काँग्रेस आणि पीडीपीचे नेत्यांची नावे समोर

November 24,2020

नवी दिल्ल्ली : २४ नोव्हेंबर - जम्मू काश्मीरमधील २५ हजार कोटींच्या जमीन घोटाळा प्रकरणामध्ये अनेक मोठ्या नावांचा खुलासा समोर आला आहे. या घोटाळ्याशी संबंध असणाऱ्यांमध्ये राज्याच्या माजी मुख्यमंत्री आणि पिपल्स डेमोक्रेटिक पार्टीचे अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती, नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्लांबरोबरच अन्य काही नेत्यांची नावं आहेत. जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यूटी अँडमिनिस्ट्रेशन आणि सीबीआयने आतापर्यंत केलेल्या तपासानुसार अब्दुल्ला यांनी १९९८ साली जम्मूमधील संजवानमध्ये तीन वेगवेगळ्या लोकांकडून तीन कनाल (१०११.७१ स्वेअर मीटर) जमीन विकत घेतली. त्यानंतर त्यांनी जंगलाचा भाग असणाऱ्या सात कनाल (३५४१ स्वेअर मीटर) जमीनीवर ताबा मिळवून त्यावर घर बांधले.

सीबीआयने केलेल्या चौकसीनुसार फारुक अब्दुल्ला यांनी जम्मू आणि श्रीनगर येथे रोशनी कायद्याअंतर्गत जमीन उपलब्ध करुन दिली तर त्यांची बहीण सुरैया मट्टू यांनाही या कायद्याच्या आधारे आर्थिक लाभ देणारे निर्णय घेण्यात आले. अब्दुल्ला यांच्या जवळच्या व्यक्तींनाही संजवान परिसरामध्ये वन आणि सरकारी जमीनीवर बेकायदेशीर ताबा मिळवला. यामध्ये प्रामुख्याने नॅशनल कॉन्फरन्सचे नेते सय्यद अली अखून यांच्या नावाचा समावेश आहे.

फारुख अब्दुल्लांनी ज्या सात कनाल जमीनीवर बेकायदेशीरपणे ताबा मिळवला त्याची किंमत अंदाजे दहा कोटी रुपये आहे. या परिसरामध्ये एकूण तीस कनाल (१५१७.७ स्वेअर मीटर) जमीन वेगवेगळ्या लोकांनी बेकायदेशीररित्या ताब्यात घेतली असून त्याची किंमत जवळजवळ ४० कोटींपर्यंत आहे.

२००१ मध्ये रोशनी कायदा तयार करण्यात आला. या काद्यानुसार बेकायदेशीरपणे जमीनीवर मालकी सांगण्यांना एक ठराविक रक्कम भरल्यानंतर त्या जागेचा मालकी हक्क देण्याचा निर्णय घेण्यात आला. या कायद्याच्या आडून राज्यातील अनेक मोठ्या व्यक्तींनी हजारो कोटींच्या जमीनी आपल्या नावावर केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सध्या सीबीआय चौकशी करत असून हे प्रकरण उच्च न्यायालयात आहे.

वृत्तानुसार या घोटाळ्यामध्ये तीन मोठे पक्ष ज्यात नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी आणि काँग्रेसच्या २०० नेत्यांची नावं आहेत. त्याचबरोबर काही आयएएस अधिकारी आणि काही मोठ्या उद्योगपतींबरोबरच हॉटेल मालकांच्या नावाचाही समावेश आहे.