बावनकुळेंच्या कार्यकाळात महावितरण मरणपंथाला लागली - नितीन राऊत

November 24,2020

नागपूर : २४ नोव्हेंबर - माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज प्रतीकात्मक चितेवर वीज बिलांना अग्नी दिल्याचं दृश्य मी टीव्हीवर पाहिलं. चितेला अग्नी देण्याचा अधिकार वारसालाच असतो. महावितरणच्या आजच्या स्थितीचे खरे वारसदार चंद्रशेख बावनकुळेच आहेत असं म्हणत उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना टोला लगावला आहे. इतकंच नाही तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यकाळातच महावितरण ही संस्था मरणपंथाला लागली त्यामुळे त्यांनी वीज बिलांच्या प्रतीकात्मक चितेला अग्नी देणं संयुक्तिक होतं असंही नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.

उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. “बावनकुळे जेव्हा उर्जामंत्री होते त्याच काळात त्यांनी महावितरणला रुग्णशय्येवर नेले असले तरीही आम्ही महावितरणला वाऱ्यावर सोडणार नाही. महावितरणच्या आजारावर उपचार आम्हीच करु, त्याला नवसंजीवनी देऊ. महावितरण धडधाकट करणे हेच आमचे पहिले प्राधान्य आहे” असंही नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, वाढीव वीज बिलाविरोधात भाजपाने सोमवारी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केले. नागपुरातही माजी उर्जा मंत्री आणि भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे रस्त्यावर उतरले होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. “महाराष्ट्र सरकारने राज्यातील आर्थिक, दुर्बल आणि मध्यमवर्गीय लोकांचं वीजबिल माफ करू, अशी घोषणा केली होती. परंतु हे सरकार आता पलटलं आहे. या सरकारनं दीड कोटी ग्राहकांवर अन्याय करण्याचा घाट घातला आहे” असा आरोप चंद्रशेखर वाबनकुळेंनी केला.