भररस्त्यात बुरखाधारी महिला गोळीबार करतानाच व्हिडीओ व्हायरल, एक महिला अटकेत

November 24,2020

नवी दिल्ली : २४ नोव्हेंबर - नवी दिल्ली येथील जाफराबाद भागात एका बुरखा घातलेल्या महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. बुरखा घातलेली ही महिला भररस्त्यात गोळीबार करीत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. ही महिला गँगस्टर नासिरची बहीण असल्याचा दावा करत दुकानाच्या शटरवर गोळ्या झाडत होती. त्यानंतर ती एका पुरुषासह दुचाकीवर बसून निघून गेली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपी महिला नुसरत (वय 30) हिला अटक केली आहे. तिच्याजवळील एक पिस्तूलही पोलिसांनी जप्त केले आहे.

आरोपी महिलेची चौकशी करून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 18 नोव्हेंबर रोजी चौहान बांगर गली नंबर -4 मध्ये घडली. व्हिडीओमध्ये एका दुचाकीवरुन बुरखा घातलेली महिला येथे येत असल्याचे दिसते. महिलेने गांजा व मद्यप्राशन केले होते. ती दुचाकीवरून उतरते व पिस्तूल काढून बंद दुकानाच्या बाहेर उभी राहून प्रथम शिवीगाळ करते. त्यानंतर तिने पिस्तूलमधून चार ते पाच गोळ्या झाडल्या.

जेव्हा दुचाकीस्वाराने तिला रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती पुन्हा शूट करते. यादरम्यान, ती स्वत: ला गँगस्टर नसीरची बहीण असल्याचे सांगते. नंतर ती दुचाकीवर बसून निघून जाते. कोणीतरी व्हिडीओ करीत हा सोशल मीडियावर व्हायरल केला आहे