प्राध्यापिकेचा विनयभंग करण्याप्रकरणी प्राचार्याविरुद्ध गुन्हा दाखल

November 24,2020

अमरावती : २४ नोव्हेंबर - महाविद्यालयातील प्राध्यापिकेचा विनयभंग करून मानसिक छळ करणाऱ्या प्राचार्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मूर्तिजापूर येथील संत गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य व सिनेट सदस्य डॉ. संतोष ठाकरे यांच्यावर मूर्तिजापूर पोलीसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

प्राचार्यांकडून होणाऱ्या त्रासाबाबत प्राध्यापिकेने मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीपूर्वी त्यांनी अमरावतीमध्ये पत्रकार परिषद घेऊन प्राचार्य संतोष ठाकरे यांच्याविरोधातील तक्रारी मांडल्या होत्या. प्राचार्य ठाकरे यांनी शिवीगाळ करून विनयभंग केल्याचा, दबावतंत्राचा वापर केल्याचा आरोप या प्राध्यापिकेने केला होता. यानंतर त्यांनी मूर्तिजापूर पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीत प्राध्यापिकेने धक्कादायक बाबी नमूद केल्या आहेत. फिर्यादी महिलेला शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याशिवाय सातवा वेतन आयोग लागू होऊ देणार नाही, असे प्राचार्यांनी सांगितल्याचे तक्रारीत म्हटले आहे. प्राध्यापिका २००९पासून गाडगेमहाराज महाविद्यालयात कार्यरत आहेत. तर संतोष ठाकरे प्राचार्य म्हणून २२ जून २०१६ पासून रुजू झाले. प्राचार्य ठाकरे यांनी प्राध्यापिकेला अमरावती येथे कारने सोडण्याच्या बहाण्याने लगट करण्याचा प्रयत्न केल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे.

महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत ४ ऑक्टोबर २०१९ रोजी स्वच्छता अभियानादरम्यान अन्य प्राध्यापकांसमोर ठाकरे यांनी आपल्याला शिवीगाळ केली तसेच निलंबित करण्याची धमकी दिल्याचा आरोपही प्राध्यापिकेने केला आहे. सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीमध्ये अडचणी निर्माण केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. आपण माफी मागावी यासाठी आपल्यावर दबाव टाकण्यात आला, तसेच अपमानित करून नोकरीतून काढण्याची धमकी दिली असल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी मूर्तिजापूर पोलिसांनी संतोष ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.