प्रेयसीला गिफ्ट देण्यासाठी तो तरुण बनला दुचाकीचोर

November 24,2020

नागपूर : २४ नोव्हेंबर - प्रेयसीचे लाड पुरवण्यासाठी कोण काय करेल हे सांगता येत नाही. अशीच एक घटना नागपुरातून समोर आली आहे. प्रेयसीला महागडे गिफ्ट देण्यासाठी तरुण चक्क दुचाकी चोर बनला आहे. सचिन अतकरी असे या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी या तरुणाला अटक केल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. दरम्यान सचिन अतकरीकडून पोलिसांनी दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. त्याने आतापर्यंत किती वाहने चोरली, ती कुठे विकली याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

गेल्या काही महिन्यांपासून अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन चोरीच्या घटना अचानक वाढल्यामुळे, पोलिसांनी वाहन चोरांना अटक करण्यासाठी काही पथके नेमली होती. दरम्यान चार दिवसांपूर्वी धरमपेठ परिसरात असलेल्या गोकुळपेठ बाजाराच्या पार्किंगमधून महागडी दुचाकी चोरीला गेली होती. त्यासंदर्भात पोलिसांनी तपास सुरू केला असता पोलिसांचा शोध आरोपी सचिन अतकरीपर्यंत जाऊन पोहचला. अंबाझरी पोलिसांनी आरोपी सचिनला ताब्यात घेऊन विचारपूस केली. या चौकशीमध्ये त्याने प्रेयसीचे लाड पुरवण्यासाठी, तीला महागडे गिफ्ट देण्यासाठी दुचाकी चोरत असल्याची कबुली दिली आहे.