कोरोनासाठी नवी लस येणे पूर्णतः शास्त्रज्ञांच्या हाती - नरेंद्र मोदी

November 24,2020

नवी दिल्ली : २४ नोव्हेंबर - दिवाळीनंतर गेल्या काही दिवसांत देशातील काही राज्यांमधील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झालं असून देशात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याच्या चर्चा सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तेथील कोरोनाची परिस्थिती आणि पुढील रणनीती जाणून घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोरोनावरील लस कधी येणार याबाबत मोठे विधान केले आहे.

मोदी म्हणाले की, कोरोनावरील लस कधीपर्यंत येईल हे सांगता येत नाही. लस बाजारात कधी येणार बाब पूर्णपणे शास्त्रज्ञांच्या हातात आहे. काही लोक याबाबत राजकारण करत आहेत. मात्र अशा लोकांना राजकारण करण्यापासून रोखता येणार नाही.

कोरोनामधून बऱ्या होणाऱ्या आणि मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तींचा विचार केल्यास जगातील इतर देशांच्या तुलनेत भारत चांगल्या स्थितीत आहे. याचं श्रेय सर्वांनी एकत्र मिळून केलेल्या प्रयत्नांना जातं. 

देशातील लोकांमध्ये अजूनही कोरोनाबाबत जनजागृतीच्या गरज आहे. देशात पुन्हा लॉकडाऊन लावणे तर्कसंगत नाही. मात्र लोकांनी स्वंयशिस्त पाळणे आवश्यक आहे. मोदी म्हणाले कोरोना लसीबाबत आम्ही सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांच्याशी सातत्याने बोलत आहोत. महाराष्ट्रात लसीकरण कशा रितीने करावे, लसीचे वितरण या संदर्भात टास्क फोर्स देखील स्थापन करण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.