एकाच दिवशी चार शेतकऱ्यांनी केली आत्महत्या

November 24,2020

यवतमाळ : २४ नोव्हेंबर - यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. सोमवारी एकाच दिवशी जिल्ह्यातील ४ शेतकऱ्यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. 

मारेगाव तालुक्यातील कोळगाव येथील किसान बापूजी सिडाम (६५) यांनी कोळगाव शिवारातील अस्वले यांच्या शेतातील सुबाभळीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. किसन यांच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक विवाहित मुलगी असा परिवार आहे. दुसऱ्या घटनेत देवडा येथे मारोती माधव बोधे (४७) यांनी स्वतःच्या शेतामध्ये  विष प्राशन करून केले. दरम्यान त्यांना वणी येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु प्रकृती चिंताजनक  असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना चंद्रपूर येथे दाखल केले होते परंतु उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.  यवतमाळ तालुक्यातील वाटखेड येथे २४ तासात एका तरुण शेतकऱ्यांसह वृद्धाने गळफास लावून  आत्महत्या केली. विठ्ठल धारे (२४) याने रविवारी दुपारी आत्महत्या केली. आजीच्या नावावर असलेली साडेतीन एकर जमीन तो वहिती करायचा. यंदा या तरुण शेतकऱ्याला केवळ तीन क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न झाले. नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून त्याने आत्महत्या केली.  तर वसंतराव वाघमारे (७०) याने सोमवारी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. 

चोवीस तासात एकाच गावात दोघांनी आत्महत्या केल्याने एकाच खळबळ उडाली आहे. राज्य सरकारने मदतीची घोषणा केली असली तरीही  प्रत्यक्षात मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही त्यामुळे आगामी काळात आत्महत्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात  येत आहे. घटनेची माहिती मिळताच यवतमाळ पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला.