वैयक्तिक स्वार्थासाठी नेत्याचे आंदोलन

November 24,2020

नागपूर : २४ नोव्हेंबर - नागपूरची गुन्हेगारी नेहमीच चर्चेचा विषय असतो. त्याच नागपुरात एक पोलीस अधिकारी अवघ्या सव्वा वर्षात 130 गुंडांना कारागृहात घालत असेल, गुन्हेगारांच्या अनेक टोळ्या उद्ध्वस्त करत त्यांचे इमले (इमारती ) जमीनदोस्त करत असेल आणि त्याच अधिकाऱ्याच्या विरोधात सत्ताधारी राजकारणी वैयक्तिक स्वार्थापायी आंदोलनाला उतरत असेल तर तुम्ही काय म्हणणार. सध्या नागपुरात तसंच घडतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष वेदप्रकाश आर्य यांनी नागपूर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. त्याला कारण ठरले आहे आर्य यांनी एका आरोपीला पाठीशी घालत त्याला थेट राजमाने यांच्या कॅबिनमध्ये नेणे आणि आरोपीला आपल्या समोर पाहून राजमाने यांनी त्याला उद्देशून म्हटलेले "गेट आउट" हे दोन शब्द.

नागपूरच्या संविधान चौकात भगतसिंह, सुभाषचंद्र बोस यांच्या बॅनर पोस्टरसह करण्यात आलेले एक आंदोलन सध्या चांगलेच चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वेदप्रकाश आर्य यांच्या नेतृत्वात झालेले हे आंदोलन एका पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधात करण्यात आले. नागपूर पोलीस गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांनी कॅबिनमध्ये अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करत वेदप्रकाश आर्य यांनी हे आंदोलन केले. दोन्ही बाजू जाणून घेतल्यानंतर मिळालेल्या माहितीप्रमाणे नागपुरात गाजलेल्या हनी ट्रॅप प्रकरणासह अनेक प्रकरणात नाव आलेल्या आणि ज्यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती गोळा केल्याचा ठपका ठेवत चौकशी सुरू केली आहे, अशा आरोपीला सोबत घेऊन वेदप्रकाश आर्य थेट राजमाने यांच्या कॅबिनमध्ये पोहोचले. मी भेटायला येतो आहे असे सांगणाऱ्या आर्य यांनी मी पोलिसांकडून चौकशी होत असलेल्या एका इसमाला सोबत घेऊन येतो आहे अशी कल्पना उपायुक्त राजमाने यांना दिली नव्हती. त्यामुळे ज्याच्या विरोधात आपले पोलीस पथक अनेक गंभीर प्रकरणात चौकशी करत आहेत त्या इसमाला समोर पाहून राजमाने संतापले आणि त्यांनी त्या इसमाला कॅबिनबाहेर जाण्यास सांगितले. नेमकं हाच मुद्दा आर्य यांनी हाताशी धरत गजानन राजमाने यांच्या विरोधात आंदोलनाची मोहीम उघडली. राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या गृह विभागाकडे तक्रारही केली आहे.