कोंबड्याच्या झुंजीवर पोलिसांचा छापा

November 24,2020

यवतमाळ : २४ नोव्हेंबर - यवतमाळ जिल्यातील  वाई (हातोला) येथे सुरु असलेल्या कोंबड्यांच्या झुंजीवरील  जुगारांवर छापा टाकून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. ही कारवाई वनविभागाच्या नर्सरीजवळ करण्यात आली. पोलिसांना बघून काही जुगाऱ्यांनी धूम ठोकली. त्यातील दहा जणांची नावे रेकॉर्डवर घेण्यात आली असून एकूण पंधरा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

शाम येटरे (वय 26, रा. सावर), हरिचंद राठोड (वय 60), सदानंद बेले (वय 30, रा. पिपरी) यांना ताब्यात घेण्यात आले. पळून जाणारे सागर कोरे (वय 32), गजानन ढेगारे (रा. सावर), गोलू किन्नाके, प्रकाश राठोड, संजय राठोड, अरुण राठोड, विजय राठोड यांनाही रेकॉर्डवर घेण्यात आले आहे.

पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी अवैध व्यवसाय पूर्णता: बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, वाई (हातोला) येथील कोंबडबाजार पोलिसांच्या नाकावर टिच्चून सुरुच होता. अखेर ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन करेवाड यांनी कारवाईसाठी सापळा रचून छापा टाकला.

यावेळी पळून जात असताना पोलिसांनी तिघांना पकडले. घटनास्थळावरून सात दुचाकीसह दोन लाख 45 हजार 460 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गणेश बुर्रेवार यांच्या तक्रारीवरून पंधरा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.