सुखी, समृध्द व शक्तिशाली हिंदुस्थान हीच आत्मनिर्भर हिंदुस्तानची संकल्पना : गडकरी

November 24,2020

नागपूर : २४ नोव्हेंबर - रामराज्यापासून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, सावरकरांपर्यंत सर्वांनी जे उद्दिष्ट समोर ठेवले ते म्हणजे सुखी, समृध्द व शक्तिशाली हिंदुस्तानचे  आहे. त्याच आधारावर आत्मनिर्भर हिंदुस्तानची  संकल्पना असल्याचे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

सिम्बॉयसिसच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ना. गडकरी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बोलत होते. सिम्बॉयसिस हे योग्य दृष्टिकोन आणि कटिबध्दता याचे चांगले उदाहरण असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- आपल्याला कोणत्या दिशेने जायचे आहे, याचे धोरण निश्चित झाले पाहिजे. केवळ सरकारने धोरण निश्चित करून होणार नाही, तर प्रत्येक क्षेत्राने स्वावलंबी होण्यासाठी आपले धोरण निश्चित करणे गरजेचे. अर्थव्यवस्था ही जीडीपीवर अवलंबून आहे. देशातील कृषी क्षेत्राचे सकल राष्ट्रीय उत्पन्न 14 ते 16 टक्के आहे. उत्पादन क्षेत्राचे 22 ते 24 टक्के तर सेवा क्षेत्राचा जीडीपी 52 ते 54 टक्के आहे. जगात आपल्याला पुढे जायचे असेल तर कृषी आणि ग्रामीण क्षेत्राचा जीडीपी हा 30 टक्केपर्यंत न्यावा लागेल, असेही ते म्हणाले.

कृषी, ग्रामीण आदिवासी भागात गरिबी, भूकमरी, बेरोजगार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील माणसांचे लोंढे रोजगारासाठी शहराकडे धाव घेत आहेत. परिणामी शहरातील पायाभूत सुविधांवर त्याचा ताण पडत आहे, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले-मागास भागात नवे उद्योग निर्माण होणे अपेक्षित आहे. शहरी भागातील उद्योगांचे विकेंद्रीकरण झाले तर रोजगारासाठी लोक शहराकडे येणार नाहीत. यासाठी कृषी, ग्रामीण आदिवासी हे तीनही क्षेत्र शक्तिशाली बनवावे लागतील. या तीनही क्षेत्राच्या विकासाचा दृष्टिकोन ठेवून नियोजन केले, तर आत्मनिर्भर भारतासाठी ते आवश्यक ठरेल. पाणी, ऊर्जा, परिवहन, संवाद या चार बाबी ज्या भागात असतील त्या क्षेत्राकडे उद्योग आकर्षिले जातील व तेथील अर्थव्यवस्था बदलेल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

आज देशाला 7 लाख कोटींचे पेट्रोल डिझेल आयात करावे लागते. पेट्रोल-डिझेलसाठी पर्याय शेतकरी देऊ शकतात, असे सांगताना  गडकरी म्हणाले- साखर, गहू, तांदूळ या देशात भरमसाठ आहेत. यापासून पर्याय इंधन म्हणून शेतकर्‍यांनी इथेनॉल निर्मिती करणे गरजेचे आहे. शेतकर्‍यांनी जैविक इंधनाची निर्मिती केली तर, हजारावर इथेनॉल निर्मितीचे उद्योग उभे राहू शकतात. इथेनॉल हा पर्याय असतानाही आपण पेट्रोल डिझेल का आयात करतो आणि प्रदूषण का वाढवतो असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.