आपत्तीवर मात करण्यासाठी यंत्रणेत योग्य समन्वय आवश्यक - एस. डी. कराळे

November 25,2020

नागपूर : २५ नोव्हेंबर - आपत्ती उद् भवल्यानंतर अशा संकटकाळात आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद दलाला राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद दलाने घालून दिलेल्या अधिनियमानुसार काम करावे लागते. जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी वेगवेगळ्या प्रशासकीय पातळ्यांवर योग्य समन्वय ठेवावा लागतो, असे प्रतिपादन राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे सहायक समादेशक एस. डी.  कराळे यांनी केले.

 राज्य आपत्ती प्रतिसाद दल  तसेच जिल्हा स्काउट आणि गाईड्स, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अंबाझरी गार्डन येथे एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी स्काऊट आणि गाईड्सच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

 जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे, प्रशासन टीम कमान्डंट एल. आर.  मिश्रा, जिल्हा संघटक श्रीमती मंजुषा  जाधव, यूएनडीपीचे जिल्हा समन्वयक विनय सोनी, पीएसआय एस.एस. जंबेली, पीएसआय आर. एन. मडावी, पीएसआय  ए. ए. काळसर्पे उपस्थित होते.  

आपत्तीचे अचूक व्यवस्थापन करताना विविध पातळ्यावर शासकीय यंत्रणेमध्ये समन्वय ठेवून काम करावे लागते. केंद्र- राज्य, राज्य –राज्य, राज्य –जिल्हा प्रशासनांदरम्यान योग्य समन्वयासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे असते. छोटी चूक महागात पडू शकते. एका चुकीमुळे लाखोंची जीवित तसेच वित्त हानी होत असते, असे सांगून ते म्हणाले की, केंद्र व राज्य यांच्यात भूमिका आणि जबाबदारी निश्चित करण्यात येते. त्या अधिनियमानुसार त्या -त्या राज्य व केंद्र शासनाने समन्वयातून काम करणे आवश्यक असते, असेही त्यंनी सांगितले.

 कोविड -19ने संपूर्ण जग अडचणीत आले. कोणतीही लस उपलब्ध नसताना केवळ जागतिक महामारीशी योग्य नियोजनातून सावरले. त्यामुळे सर्वांना 2020 मध्ये सर्वांना आपत्ती व्यवस्थापनची खऱ्या अर्थाने नव्याने ओळख झाली, असे प्रतिपादन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यांनी केले.  

 मानवासमोर संकटे अचानक उद् भवतात आणि त्याचे दुष्परिणाम मोठे असतात. त्सुनामी, भोपाळ गँस दुर्घटना, कोविड- 19 आदि होत. त्यांच्यामुळे जीवित व आर्थिक, पर्यावरणीय हानी मोठ्या प्रमाणावर होते.  त्यामुळे ते आपत्ती ठरतात. अशी आपत्ती 2020 च्या सुरुवातीला संपूर्ण जगासमोर उभी राहिली. त्या कोविड-19 आपत्तीने सर्वांना हायजीन, डिसीप्लीन, स्वच्छता यांची माहिती करून दिली आहे. असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती सांगितल्या.  मानवाने स्ट्रक्चरल आणि अनस्ट्रक्चरल कँपसिटी वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.  

यावेळी पोलीस निरीक्षक मिश्रा यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाबाबत विद्यार्थ्यांना माहिती देताना विभागाची स्थापना व त्याचे कार्य, भूमिका आणि जबाबदारी याबाबत माहिती दिली. राज्य आपत्ती प्रतिसाद दल तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल कार्यरत आहेत. महाराष्ट्रापूर्वी इतर 8 राज्यात त्यांची स्थापना झाली असून, महाराष्ट्र हे नववे राज्य असल्याचे त्यांनी सांगितले.