सर्वसेवा संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून नवा वाद

November 25,2020

वर्धा : २५ नोव्हेंबर - सर्वसेवा संघाच्या अध्यक्ष निवडीसाठी एका गटाने पुढच्या आठवड्यात सेवाग्राम येथे अधिवेशन आयोजित केले असतानाच, दुसऱ्या गटाने ऑनलाइन निवडणूक घेतली. प्रदीपकुमार बजाज यांची अध्यक्षपदी अविरोध निवड केली. ही निवड बेकायदा असल्याचा आरोप विरोधी गटाने केला आहे. या नव्या निवडीवरून पुन्हा एकदा वादळ उठण्याची शक्यता आहे. 

गांधीजींच्या विचारावर काम करणाऱ्या सगळ्या संस्थांची एक शिखर संस्था म्हणून सर्वसेवा संघ ओळखला जातो. या संघात गेल्या काही महिन्यांपासून गटबाजी सुरू आहे. एका गटाने ऑनलाइन अधिवेशन घेऊन, अध्यक्ष महादेव विद्रोही यांना हटविले. चंदन पाल यांची अध्यक्षपदी निवड केली होती. त्यावरून वाद सुरू असतानाच, विद्रोही यांच्या गटाने ६ डिसेंबर रोजी उत्तर प्रदेशातील फारुखाबाद येथे अधिवेशन आयोजित केले होते. त्यात अध्यक्ष निवड होणार होती. चंदन पाल यांच्या गटाने या नोव्हेंबर महिन्यात २८ आणि २९ तारखेला सेवाग्राम येथे अधिवेशन आयोजित करून त्यात अध्यक्षाची निवड करण्याचे ठरविले होते. या अधिवेशनाची तयारी सुरू असतानाच, विद्रोही यांच्या गटाने संघाचे महामंत्री लक्ष्मण यांच्या अनुमतीने अध्यक्षपदाची ऑनलाइन प्रक्रिया सुरू केली. तेलंगण सर्वोदय मंडळाचे संयोजक अरविंद रेड्डी यांना निवडणूक अधिकारी नियुक्त केले. निवडणूक प्रक्रियेत बिहार येथील पंचम नारायण सिंग, प्रा. आनंद किशोर आणि प्रदीपकुमार बजाज या तिघांचे अर्ज प्राप्त झाले. आज अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी सिंग आणि प्रा. किशोर यांनी माघार घेतल्याने बजाज यांची अविरोध निवड झाल्याची घोषणा संघाचे मंत्री चंद्रकांत चौधरी यांनी केली. बजाज मूळ वाराणसी येथील आहेत. ते जयप्रकाश नारायण यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. उत्तर प्रदेशातील रुद्रपूर विधानसभा मतदारसंघातून जनता पार्टीकडून ते निवडून आले होते.