भाजपने आजवर पदवीधरांच्या समस्या सोडवल्या नाहीत - सुनील केदार यांचा आरोप

November 25,2020

नागपूर : २५ नोव्हेंबर - पदवीधर मतदारसंघ निर्माण झाल्यापासून आजपर्यंत भाजपच्याच हाती हा मतदारसंघ राहिला. आजपर्यंत निवडून आलेल्या भाजपच्या एकही प्रतिनिधीने पदवीधरांची समस्या सोडवल्या नाही. अशा भाजपचा बालेकिल्ला राहिलेला पदवीधर मतदारसंघावर घाव घालण्याची वेळ आलेली आहे. राज्यात शिवसेना-काँग्रेसचे सरकार असून काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या ऍड. अभिजित वंजारी यांना निवडून आणा, असे आवाहन दूधविकास व्यवसाय मंत्री सुनील केदार यांनी केले. 

नागपूर विधानपरिषद पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना, पीरिपा (कवाडे गट), आरपीआय (गवई गट) आणि मित्र पक्षाच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजित गोविंदराव वंजारी यांच्या प्रचारार्थ मंगळवारी कोंढाळी  व वाडी येथे सभा झाल्या. वाडीला  झालेल्या सभेला खासदार कृपाल तुमाने यांनी अभिजित वंजारी यांना निवडून देत काँग्रेसला पदवीधर संघाच्यानिवडणुकीत विजयी करा असे आवाहन केले. अभिजित वंजारी यांनी शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील असे आश्वासन दिले. कोंढाळी येथे झालेल्या सभेला पालकमंत्री सुनील केदार यांच्यसह माजी मंत्री राजेंद्र मुळक, नानाभाऊ गावंडे, सलील देशमुख, रमेश बंग, आदींची उपस्थिती होती.