कंत्राटी रुग्णवाहिका चालकांचे जिल्हा परिषदेसमोर उपोषण

November 25,2020

भंडारा : २५ नोव्हेंबर - आरोग्य विभागात कार्यरत कंत्राटी रुग्णवाहिका चालकांनी जिल्हा परिषदेसामोर उपोषण सुरु केले आहे. त्यांनी बोनस व सुधारित वेतन देण्याची मागणी केली आहे. 

आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या १०२ रुग्णवाहिका चालविण्याचे कंत्राट भोपाळ येथील एजन्सीला दिले असून, तुटपुंज्या वेतनात चालकांकडून काम करवून घेतल्या जात आहे. २४ तास काम करणाऱ्या चालकांना या एजन्सीने दोन वर्षांपासून दिवाळीला वेतन दिले नाही. तसेच प्रत्येक महिन्यात नियमित वेतन मिळत नसल्याची चालकांची तक्रार आहे.  त्यामुळे या चालकांच्या कुटुंबाची दिवाळी अंधारातच गेली. संघटनेचे अध्यक्ष डोंगरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याचे  बिलही अद्याप देण्यात आलेले नाही. तेव्हा वेतन व बोनस देण्याच्या मागणीवरून रुग्णवाहिका चालकांनी  जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरु केले. यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील चालक सहभागी झाले आहेत. याआधीही या संघटनेने  अनेकदा आंदोलने केली परंतु कंत्राटदार कंपनी व अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवून चालकांवर अन्याय करत असल्याचा आरोप संघटनेचे  सचिव महेंद्र मेश्राम यांनी केला आहे.