सरकार सर्व प्रश्न टप्प्याटप्प्याने प्राधान्याने सोडवणार - उद्धव ठाकरे

November 26,2020

अमरावती : २६ नोव्हेंबर - महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यानंतर शिक्षकांचे अनेक प्रश्न मार्गी लावले तर काही प्रश्न प्रलंबित आहे. आघाडी सरकार तुमचे हक्काचे सरकार असून सर्व प्रश्न टप्प्याटप्प्याने प्राधान्याने सोडवणार असल्याची ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिक्षक मतदारांना दिली.

अमरावती विभाग शिक्षक मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्रीकांत देशपांडे यांच्या प्रचारार्थ आयोजित ऑनलाईन सभेला शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक यावेळी अधिकृतरित्या शिवसेनेतर्फे लढविण्यात येत असून आघाडीने श्रीकांत देशपांडे यांना उमेदवारी दिली आहे.

 प्रा. देशपांडे यांनी मागील सहा वर्षात शिक्षकांचे प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीने सभागृहात मांडले आणि ते सोडविण्याचा प्रयत्न केला. काही प्रश्नांची सोडवणूक झाली तर काही प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे आणि काही प्रश्न प्रलंबित आहे. परंतु, आज आपले सरकार सत्तेत आहे. हक्काचे आणि शिवसेनेचे प्रतिनिधी सभागृहात राहणार आहे. आता सभागृहात आवाज उठविल्यानंतर त्यांचा आवाज ऐकणारे सरकार आहे. शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे याची सरकारला जाण असल्याची कबुली देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना दिली. कोरोनाच्या काळात काही समस्या बाजूला पडल्या पण आता संकट टळू लागले आहे. त्यामुळे या प्रलंबित समस्यांकडे लक्ष देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मतं मिळावीत म्हणून आश्वासन देत नसून आपल्या प्रतिनिधीच्या माध्यमातून आपले प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.