मूल तालुक्यात १६ नवीन पुलांचे बांधकाम पूर्ण

November 26,2020

चंद्रपूर : २६ नोव्हेंबर - मूल तालुक्यात सुमारे 16 नविन पुलांचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम उपविभागाने पूर्ण केल्याने नागरिकांना पुराच्या त्रासापासून सुटका झाली आहे. या पुलांवरून रहदारी सुरू झाली असून, दळणवळण सुलभ झाले आहे. ही सर्व पुलाची कामे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या प्रयत्नांचे फलित आहे.

जनतेला पावसाचा होणारा त्रास दूर करण्याच्या दृष्टीने राज्याचे माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे मागील सरकारने अर्थसंकल्पात 26 नविन पुलांसाठी निधी मंजूर झाला होता. यामधील हळदी ते नलेश्वर या मार्गावर 3 पुलांचे काम पुर्ण झाले. चिचाळा ते कवळपेठ या मार्गावर 2, जानाळा ते सुशी मार्गावर 2, नवेगांव-कोरंबी-बेंबाळ मार्गावर 3, मूल ते चामोर्शी 1, चिखली ते कन्हाळगांव मार्गावर 1, पेठगांव भादुर्णी मार्गावर 2, फिस्कुटी ते गडीसुर्ला मार्गावर 1, तर सिंताळा ते फिस्कुटी 1 पुलांचे काम पूर्ण झाले आहे. तर, काही पुलांचे काम अंतिम टप्प्यात आहे.

 सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अधिकारी प्रशांत वसुले यांनी शाखा अभियंत्यांना मार्गदर्शन करून व वारंवार कामाच्या ठिकाणी जावून तात्काळ काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. या मार्गावरील काही रस्त्याच्या रूंदीकरणाचे कामे पूर्ण करण्यात आले आहे. तर रूंदीकरणाचे काम शिल्लक असलेल्या रस्त्याचेे काम काही दिवसात पुर्ण करण्यात येणार असल्याने नागरीकांना ये-जा करण्यासाठी सुलभ होणार आहे. नवीन बांधकाम केलेल्या 16 पुलामुळे व रहदारीचा मार्ग सुलभ झाल्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी आमदार मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.