अकारण निलंबित केल्याने ३५ कर्मचाऱ्यांनी सुरु केले कामबंद आंदोलन

November 26,2020

गडचिरोली : २६ नोव्हेंबर -  आलापल्ली येथील वनसंपदा इमारतीत स्थित भामरागड वनविभागातील आस्थापना लेखापाल एम.जे.पिल्लीवार यांना काल कोणतेही कारण नसतांना भामरागड वनविभागाचे उपवनसंरक्षक रज्जत कुमार (भावसे) यांनी तडकाफडकी निलंबित केले होते. त्यामुळे उपवनसंरक्षकांच्या या निर्णयावर संतापलेल्या कार्यालयातील ३५ कर्मचाऱ्यांनी आज सकाळ पासून बेमुद्दत कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

भामरागड वनविभागाचे उपवनसंरक्षक रज्जत कुमार (भावसे) हे आल्यापासून कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी मनमानी पध्दतीने वागत होते कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देत होते. त्यांच्या अश्यावागणुकीमुळे कर्मचारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. असाच प्रकार काल दि.२४ नोव्हेंबर २०२० रोजी घडला. लेखापाल पिल्लीवार कार्यालयीन कागदपत्र घेऊन उपवंनसरक्षकांच्या कक्षात गेले असता त्यांना उपवनसंरक्षकांनी अपमानास्पद वागणूक देऊन कोणतेही कारण नसतांना तडकाफडकी निलंबित केले. त्यामुळे कार्यालयात भीतीचे वातावरण तयार झाले. विभागीय कार्यालयातील कर्मचारी वर्गांनी एन.आर.प्रविण मुख्यवनसंरक्षक (प्रा.) गडचिरोली यांना घडलेल्या प्रकरणाबाबत निवेदनाद्वारे माहिती दिली आणि विविध मागण्या त्यांच्या समोर ठेवल्या

 मुख्य वनसंरक्षक एन.आर.प्रवीण यांनी आपल्या अधिकाराचा वापर करत महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ च्या नियम ४ च्या पोट नियम (५) च्या खंड (क) अन्वये निलंबित केलेल्या लेखापालाचे निलंबन रद्द केले.उपवनसंरक्षक रजत कुमार यांनी घेतलेला निर्णय फिरविला.

 वनकर्मचार्यांनी दिलेल्या निवेदनात,रज्जत कुमार (भावसे) भामरागड वनविभागात रुजू झाल्यापासून कार्यालयीन कर्मचारी, वनपरिक्षेत्र अधिकारी आणि वनपाल-वनरक्षक (क्षेत्रीय कर्मचारी) यांना कारण नसतांना सूडबुध्दीने मानसिक त्रास देत असल्यामुळे वनकर्मचाऱ्यांनी हिटलरशाही उपवनसंरक्षकाविरोधात वनमंत्री संजय राठोड, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) सह इतर वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी निवेदन दिले आहे. यात चुकीच्या मार्गाने व सूडबुध्दीने दंडात्मक कारवाई करणाऱ्या रज्जत कुमार उपवनसंरक्षक भामरागड यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि उपवनसंरक्षक रज्जत कुमार यांची तात्काळ भामरागड वनविभागातून बदली करण्यात यावी. तसेच जो पर्यंत या मागण्या पूर्ण होणार नाही तो पर्यंत आम्ही सामूहिक रजेवर राहणार असा इशारा सुद्धा कर्मचाऱ्यांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आता वनकर्मचाऱ्यांच्या या मागण्याची दखल घेऊन काय मार्ग काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..