कार चोरून परराज्यात विकणाऱ्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

November 26,2020

बुलढाणा : २६ नोव्हेंबर - औरंगाबाद, जालना, परभणी, जळगाव व अहमदनगर जिल्ह्यात स्विफ्ट कार चोरी करुन त्यांची परराज्यात विल्हेवाट लावणार्या टोळीचा औरंगाबाद गुन्हे शाखेने पर्दाफाश करून त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. यावेळी आरोपींच्या ताब्यातून 3 स्विफ्ट कार, एक दुचाकी व सात मोबाइल असा एकूण 19 लाख 24 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. या आरोपींमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील तीन आरोपींचा समावेश आहे

देऊळगावराजा येथील रहिवासी महेश किशोरराव भोसले यांनी कन्नड पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार 21 नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजता त्यांची मावशी कमलाबाई देशमुख रा. कन्नड यांचे घरासमोर (एम.एच-21 ए.एक्स 3004) या क्रमांकाची कार उभी केली होती. तर मावस भाऊ नितीन देशमुख यांच्या मालकीची स्विफ्ट कार क्रमांक (एम.एच 20 डी.जे-6488) ही कन्नड एल.आय.सी ऑफीसच्या पार्किंगमध्ये लावली होती. दरम्यान 21 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दोन्ही कार लंपास केल्या. या तक्रारीवरून कन्नड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व पोलिस कर्मचार्यांनी घटनास्थळास भेट देऊन आसपासचे सी.सी.टी.व्ही फुटेजची पडताळणी केली. त्यानंतर या कारच्या चोर्या शेख दाऊद शेख मंजूर, रा. धाड याने व त्यांच्या मुलांनी त्यांच्या इतर साथीदारांसह केल्या आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली.

 या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरट्यांचा चिखली भागात शोध घेतला असता ते चिखली शहरातील रोहिदास नगर येथे असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी रोहिदास नगरात जाऊन शेख दाऊद शेख मंजर, वय 55 वर्ष रा. धाड, व त्याचा मुलगा शेख नदीम शेख दाऊद, वय 22, शेख जिशान शेख दाऊद, वय 28, रा.धाड ह.मु. घाटनांद्रा, सखाराम भानुदास मोरे वय 31 वर्ष, रा.निरखेडा ता.जालना व दीपक दिगंबर मोरे वय 20 रा.निरखेडा ता.जि.जालना यांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांना वाहनांबाबत विचारपूस केली असता त्यांनी 21 नोव्हेंबरच्या रात्री कन्नड येथून दोन स्विफ्ट कार चोरुन आणल्याची व त्यांचे नंबर प्लेट बदली केल्याचे सांगितले. तसेच सेलू येथून एक स्विफ्ट कार ऑक्टोबर महिन्यात चोरुन आणल्याची कबुली दिली. तसेच कन्नड येथून चोरलेली एक स्विफ्ट कार त्यांनी बनावट नंबर प्लेट लावून कुंभारवाडा चिखली येथे लावून ठेवली आहे, अशी कबुली दिली. यावेळी आरोपीच्या ताब्यातून 3 स्विफ्ट कार, एक होंडा शाईन मोटार सायकल व सात मोबाइल असा एकूण 19 लाख 24 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी चोरट्यांना कन्नड शहर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.