तिघांनी तलवारीने वार करून केली कुख्यात गुंडाची हत्या

November 26,2020

वर्धा : २६ नोव्हेंबर - वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या कारणातून वध्र्यात एका कुख्यात गुंडाची तिघांनी मिळून तलवारीने वार करून हत्या केली. ही घटना रेल्वे कॉलनी येथील लायब्ररीच्या परिसरात रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. शुभम रतन बैस (वय २१) रा. हिंदनगर असे आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

त्याचा खून करणार्यांची नावे शुभमने मृत्यूपूर्व बयाणात सांगितली आहे. त्यांची नावे ऋषिकेश मेंढे, सुशील खोब्रागडे आणि रवी समुद्रे सर्व रा. विक्रमशीलानगर अशी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या शोधात पोलिस पथक रवाना झाले आहे. अद्याप पोलिसांना त्यांचा कुठलाही सुगावा मिळाला नाही. 

पोलिस सूत्रानुसार, गौरक्षण वॉर्ड परिसरात शुभम बैस याचे गुंडगिरीचे चांगलेच प्रस्त आहे. यामुळे त्याचा आणि हल्ला करणारा सुशील खोब्रागडे, ऋषिकेश मेंढे तसेच रवी समुद्रे या तिघांची वाद होता. यातून त्यांच्यात नेहमीच भांडणे होत होती. या भांडणातून त्यांच्यातील वाद चांगलाच विकोपाला गेला. यात या तिघांनी अखेर शुभमला संपविण्याचा निर्णय घेतला. 

त्याला संपविण्याच्या प्रयत्नात हे तिघे मागावर होते. यातच सोमवारी रात्रीच्या सुमारास शुभम रेल्वे लाइन परिसरातील ग्रंथालयाच्या आवारात एकटाच बसून असल्याची माहिती मिळाली. यावरून हे तिघे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जवळ असलेल्या धारदार शस्त्राने शुभमच्या डोक्यावर मागाहून वार केले. यात गंभीर जखमी होऊन शुभम रक्ताच्या थारोळ्यात पडला. याची माहिती त्यांच्या सहकार्यांना मिळताच त्यांनी त्याला सेवाग्राम रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. दरम्यान पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी रुग्णालय गाठत त्याचे बयाण नोंदविले. याच वेळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. 

या हत्या प्रकरणातील मृतक शुभम हा कुख्यात गुंड असून त्याच्यावर रामनगर पोलिसात विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. काही गुन्ह्यात कोठडीही भोगली आहे. याच वादातून त्याची हत्या करण्यात आली असावी असा संशय पोलिसांच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे.