भाजीपाला उत्पादक शेतकऱ्याने गायीसमोरच मांडला भाजीपाला, भाव मिळत नसल्यामुळे संताप

November 26,2020

अमरावती : २६ नोव्हेंबर - मोठ्या कष्टाने पिकविलेली मेथी व कोथिंबीर तिवसा येथील आठवडी बाजारात कवडीमोल भावातही कुणी घेण्यास तयार नसल्याने अखेर एका भाजी विक्रेत्याने सदर शेतमाल हा गायींपुढेच मांडून संताप व्यक्त केला. दिवसेंदिवस सर्व जीवनोपयोगी वस्तूंचे भाव वाढत आहे. मात्र पारंपरिक पिके घेवून धान्य पिकविणारे शेतकरी, भाजीपाला उत्पादक शेतकरी, संत्रा उत्पादक शेतकरी यांच्यावरच आजपर्यंत अन्याय होत आला आहे. जगाचा पोशिंदा शेतकरी, जो शेतात राब-राब राबून, कष्ट करून शेतमाल पिकवितो, त्याच शेतकर्यांवर पिकविलेला माल हा मिळेल त्या भावात द्यावा लागत आहे. अतिशय घाटाचा सौदा शेतकर्यांसोबत होत असून शासनाने आता शेतकर्यांच्या मालाला योग्य असा भाव देत त्यांना खर्या अर्थाने न्याय देणे गरजेचे आहे.

 तिवसा येथे भरलेल्या आठवडी बाजारात चक्क एका भाजी विक्रेत्याने कवडीमोल भावातही मेथी, कोथिंबीर विकल्या जात नसल्याने अक्षरशः रस्त्यावर सदर माल टाकून गायींपुढेच मांडला. त्यामुळे शेतकर्याच्या मालाला भाव नसल्याने किती दयनीय अवस्था होत आहे, हे दिसून येत आहे.