नवे शैक्षणिक धोरण आपल्या शिक्षण व्यवस्थेचा आमूलाग्र भाग बनेल - नरेंद्र मोदी

November 26,2020

नवी दिल्ली : २६ नोव्हेंबर - केंद्र सरकारने मंजूर केलेले नवे शैक्षणिक धोरण देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनापर्यत आपल्या शिक्षण व्यवस्थेचा आमूलाग्र भाग झालेले असेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुधवारी व्यक्त केला.

लखनौ विद्यापीठाच्या शताब्दी स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आभासी माध्यमातून बोलत होते. शिक्षक आणि माझ्या तरुण विद्यार्थी मित्रांनी नव्या शैक्षणिक धोरणावर जास्तीतजास्त चर्चा घडवून आणावी आणि हे धोरण पूर्ण क्षमतेने अंमलात येईल, यासाठी ठोस पुढाकार घ्यावा, असे आवाहन मोदी यांनी केले.

लखनौ विद्यापीठाने २०४७ पर्यंतचे उद्दिष्ट आताच निर्धारित करावे आणि त्याच्या पूर्ततेसाठी वाटचाल करावी. याच प्रवासात आपल्या देशाकरिता काय करता येईल, यावरही विचार करावा आणि आवश्यक ते सर्वच करावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

लखनौ शहराची ओळख विशिष्ट प्रकारच्या कुर्त्यासाठी आहे. ती कायम ठेवण्यासाठी विद्यापीठाने स्थानिक संस्कृती आणि उत्पादनांवर आधारित व्यावसायिक अभ्यासक्रमही सुरू करावे, असा सल्लाही मोदी यांनी दिला.

विद्यार्थ्यांनी स्थानिक नागरिकांना, त्यांना त्यांच्या क्षेत्रात किती वाव आहे आणि ते काय करू शकतात, याची जाणीव करून द्यावी. आपण आपल्या कौशल्याचा पुरेपूर वापर करीत नाही आणि हीच आपली खरी समस्या आहे. यात विद्यार्थी महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात, असे त्यांनी सांगितले.