तटरक्षक दलाने जप्त केला मोठा मादकपदार्थांचा साठा

November 26,2020

कोचीन : २६ नोव्हेंबर - श्रीलंकेतील एका नौकेतून भारतीय तटरक्षक दलाने १०० किलो हेरॉईनसह मोठ्या प्रमाणात मादकपदार्थांचा साठा जप्त केला आहे. १७ नोव्हेंबरपासून ९ दिवस मोहीम राबवत तुतीकोडी सामुद्रीधुनीत ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

या प्रकरणी श्रीलंकेचे नागरिकत्व असलेल्या चालक दलाच्या ६ सदस्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू करण्यात आली. भर समुद्रात कराचीमधील एका गलबतातून हे मादकपदार्थ नौकेत चढविण्यात आले होते, अशी कबुली चौकशी दरम्यान चालक दलाच्या सदस्यांनी दिली. हे मादकपदार्थ पाश्चिमात्त्य देशांत आणि ऑस्ट्रेलियात पाठवले जात होते, अशी कबुली देखील त्यांनी दिली आहे.

या नौकेवरून हेरॉईनची ९९ पाकिटे, कृत्रिम मादकपदार्थांचे २० लहान डबे, ९ मिमी व्यासाची ५ पिस्तुले आणि एक सॅटेलाईट फोन जप्त करण्यात आले, अशी माहिती या कारवाईत सहभागी असलेल्या एका अधिकार्याने दिली. मादकपदार्थ नौकेच्या रिकाम्या इंधन टाकीत दडवून ठेवण्यात आले होते.

ही नौका श्रीलंकेतील पश्चिम तटावरील नेगॉम्बो येथे वास्तव्य करणार्या अलेन्सू कुट्टिगे सिन्हा दीप्ता सानी फर्नांडोच्या मालकीची आहे, अशी माहिती चालक दलाच्या सदस्यांनी दिली. ताब्यात घेतलेल्या सहा चणांना तुतीकोडी बंदरात आणले असून, विविध तपास यंत्रणा त्यांची चौकशी करीत आहे. पाकिस्तान जगभरात केवळ जिहादच पसरवत नाही, तर मादकपदार्थांची तस्करी देखील करीत आहे, असे या कारवाईत सहभागी असलेल्या एका अधिकार्याने सांगितले.

हे मादकपदार्थ तामिळनाडूतील तस्करापर्यंत पोहोचवली जाणार असल्याची शक्यता असून, त्या दिशेनेही तपास केला जात आहे. पाकिस्तानातून नेमकी कुणी मादकपदार्थांची तस्करी केली, याची चौकशी नियंत्रण विभाग (एनसीबी) करीत आहे. पाकिस्तानातील खोलवर प्रदेशाचे पाठबळ लाभलेल्या तस्करांकडून अफगाणिस्तानमधील हेरॉईनची विविध देशांत तस्करी केली जात असल्याची शक्यता अधिकार्यांनी व्यक्त केली.