तामिळनाडूला बसणार चक्रीवादळाचा तडाखा

November 26,2020

चेन्नई : २६ नोव्हेंबर - तमिळनाडू आणि पुडुचेरीला ‘निवार’ चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या चक्रीवादळाने रौद्र रूप धारण केले असून ते तमिळनाडू आणि पुडुचेरी यादरम्यानच्या तटवर्ती क्षेत्रावर आदळण्याची शक्यता आहे, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

सोसाटय़ाचे वारे आणि पावसाने तमिळनाडूच्या अनेक भागांना बुधवारी झोडपून काढले असून प्रशासनाने एक लाखाहून अधिक जणांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. त्याचप्रमाणे खबरदारीचे उपाय म्हणून अनेक भागांमधील विजेचा पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

तमिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी १३ जिल्ह्य़ांमध्ये जनतेच्या सुरक्षेसाठी गुरुवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. महसूलमंत्री आर. बी. उदयकुमार यांनी सांगितले की, एक लाख तीन हजार २९१ जणांना एक हजार मदत केंद्रांमध्ये हलविण्यात आले आहे. या केंद्रांवर अन्न, पाणी आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंसह मुखपट्टय़ाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

तमिळनाडूमध्ये काही ठिकाणी वीजपुरवठा दुपारपासून खंडित करण्यात आला आहे. तटवर्ती जिल्ह्य़ातील वाहतुकीवरही पोलिसांनी निर्बंध घातले आहेत. विमानतळही २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजल्यापासून २६ नोव्हेंबर सायंकाळी सात वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. काही रेल्वे गाडय़ांचे मार्ग बदलण्यात आले आहेत, तर काही गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. निवार चक्रीवादळ कराइकल आणि मम्मल्लापूरम यादरम्यान बुधवार आणि गुरुवारच्या मध्यरात्री धडकणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. चक्रीवादळ चेन्नईपासून २५० कि.मी. अंतरावर, तर पुडुचेरी आणि कड्डलोरपासून अनुक्रमे १९० कि.मी. आणि १८० कि.मी. अंतरावर आहे.या परिसरामध्ये ताशी १२०-१३० कि.मी. वेगाने वारे वाहात असून हा वेग ताशी १४५ कि.मी.वर जाण्याची शक्यता आहे. तमिळनाडूच्या तटवर्ती क्षेत्रात आणि उत्तरेकडील  भागांत बुधवारी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता  आहे.

 ‘निवार’ चक्रीवादळाचा प्रभाव काही प्रमाणात महाराष्ट्रावरही पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. २६ आणि २७ नोव्हेंबरला प्रामुख्याने विदर्भात काही ठिकाणी आणि मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, २६ नोव्हेंबरला विदर्भात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. २७ नोव्हेंबरला संपूर्ण राज्यात तुरळक भागांत पावसाची शक्यता आहे. २६ आणि २७ नोव्हेंबरला विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाचा इशाराही देण्यात आला आहे.