भीषण अपघातात वंचित बहुजन आघाडीचे ५ कार्यकर्ते जागीच ठार

November 26,2020

औरंगाबाद : २६ नोव्हेंबर - औरंगाबाद-बीड महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात वंचित बहुजन आघाडीच्या पाच कार्यकर्त्यांचा जागीच मृत्यू झाला. कार चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. वंचितचे कार्यकर्ते लातुरवरून औरंगाबादला येत होते. गेवराई बायपासजवळ कार ऑईल घेऊन जाणाऱ्या टँकरवर जाऊन धडकली.

बीड-औरंगाबाद महामार्गावर गेवराई बायपासला भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. कार चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला असून,  लातूरहून औरंगाबादला जाणाऱ्या आय-२० कारने रस्ता ओलांडून औरंगाबादकडून येणाऱ्या ऑइल टँकरला धडक दिली. या अपघातामध्ये कारमधील वचिंतच्या पाच पदाधिकाऱ्यांचा मृत्यू झाला.

हा अपघात इतका भीषण होता की, टँकरला धडकल्यानंतर कारचा अक्षरश: चुराडा झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जणांचा उपचारासाठी घेऊन जात मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान मृतांची नावं अद्याप समजू शकली नाहीत. मात्र प्राथमिक वृत्तानुसार, मृतांमध्ये लातूर जिल्हा वंचितचे जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे यांचा समावेश आहे.