तोतया पोलीस अधिकाऱ्याला नागपुरात अटक

November 26,2020

नागपूर : २६ नोव्हेंबर - पोलिस अधिकारी असल्याचे सांगत तोतयागिरी करणार्या व्यक्तीला सीताबर्डी पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. गारमेंट व्यापार्याच्या सजगतेमुळे हा तोतयागिरी करणारा आरोपी पोलिसांच्या हाती लागला आहे. अजय शिवदास जाधव (६२) रा. बदनपूर असे आरोपीचे नाव आहे.

सीताबर्डी पोलिस ठाणे हद्दीत फ्रेण्ड्स नावाच्या कपड्याच्या दुकानाचे संचालक गुड्ड अग्रवाल हे पोलिस अधिकारी-कर्मचार्यांचे गणवेश व इतर वस्तूंचे अधिकृत विक्रेते आहेत. दरम्यान, मंगळवारी रात्री ७.३0 वाजता आरोपी जाधव दुकानात आला. त्यानंतर त्याने अग्रवाल यांच्या कर्मचार्याला पोलिस निरीक्षकाचा बॅच मागितला. अशा प्रकारच्या गणवेशाची विक्री करण्याकरिता आयकार्डची झेरॉक्स, मोबाईल नंबर आदींची माहिती घेतली जाते. दुकानातील कर्मचार्याला आरोपी जाधव यांनी बॅचची मागणी केल्यानंतर त्यांना मॅनेजर रामचंद्र डोंगरे यांच्याकडे पाठविले. डोंगरे यांना आरोपी जाधववर संशय आला. आरोपी जाधव हा खाकी पॅन्ट व बेल्ट घालून होता. आणि ऐटीत बोलत होता. त्याचे हावभाव हे संशयास्पद होते. त्यामुळे व्यापाराने त्याला दुकानात थांबवून ठेवले. सीताबर्डी पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी जाधवची विचारपूस केली. त्यानंतर तो तोतया असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.