पक्ष देशापेक्षा मोठा मानल्यास देशाचे स्वातंत्र्य धोक्यात येऊ शकते - डॉ. मुणगेकर

November 26,2020

नागपूर : २६ नोव्हेंबर - 'संविधान प्रणालीत सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या जबाबदाऱ्या निश्चित आहेत. मात्र, पक्षप्रणाली देशापेक्षा मोठी मानत गेल्यास देशाचे स्वातंत्र्य धोक्यात येऊ शकते. आज देशातील वातावरण अशाच दिशेने जात असून, हे आगामी काळातील धोकादायक वळणाचे संकेत आहेत', असे प्रतिपादन माजी खासदार व प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केले.

संविधान फाउंडेशनतर्फे बुधवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या २५ नोव्हेंबर, १९४९च्या भाषणांवर आधारित 'संविधानिक मूल्ये' या विषयावर ऑनलाइन व्याख्यान झाले. त्यावेळी डॉ. मुणगेकर बोलत होते. 

संविधान फाउंडेशनचे संस्थापक व माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. मुणगेकर म्हणाले, 'राजकीय सत्तेचा गैरवापर हा देशासाठी धोकादायक आहे. आजची अवस्था त्याच दिशेने जात आहे. लव्ह जिहाद, गोरक्षा, हिंदुत्व यांसारखे मुद्दे सर्वसामान्यांच्या प्रश्नापेक्षा महत्त्वाचे नाहीत. यामुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकते. संवैधानिक मूल्यांवर आधारित डॉ. बाबासाहेबांनी केलेले विवेचन हे देशाच्या एकतेला अधिक बळकट करणारे आहे.' 

संविधानाचा जागर करण्यासाठी धडपड करणारे ई. झेड. खोब्रागडे यांचे २६ नोव्हेंबर या संविधानदिनी ऑनलाइन व ऑफलाइन व्याख्यानांचे कार्यक्रम आहेत. सकाळी १० वाजता नागपूर विद्यापीठातर्फे आयोजित ऑनलाइन व्याख्यानात ते 'संविधान' या विषयावर बोलतील. सकाळी ११.३० वाजता राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्सतर्फे 'संवैधानिक मूल्ये' या विषयावर व्याख्यान देतील. भीम की बेटीतर्फे पवार भवन येथे ऑफलाइन व्याख्यान तर सायंकाळी ६ वाजता बार्टीतर्फे डॉ. हेमंत तिरपुडे यांच्या उपस्थितीत आणि रात्री ८ वाजता अरुण जावळे यांनी आयोजित केलेल्या ऑनलाइन कार्यक्रमातही खोब्रागडे हे 'संविधान' या विषयावर व्याख्यान देतील.