मनोरुग्ण मुलाने केली वडिलांची हत्या

November 26,2020

नागपूर : २६ नोव्हेंबर - धारदार शस्त्राने वार करून वडिलांची हत्या केल्यानंतर मृतदेह रस्त्यावर फेकला. त्यानंतर निर्वस्त्र होऊन मारेकरी मुलाने जेवण केले. काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना एमआयडीसीतील अमरनगरमधील पालकर ले-आऊट येथे काल  रात्री ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सम्राट रंगारी (वय ५८), असे मृत व्यक्तीचे नाव आहे तर सिकंदर रंगारी (वय २७), असे मारेकरी मुलाचे नाव आहे. सम्राट हे एमआयडीसीतील कंपनीत कामाला होते. 

सिकंदर व सम्राट हे दोघेच घरात होते. सिकंदर याने किरकोळ कारणावरून सम्राट यांच्यासोबत वाद घातला. त्यातून संतप्त झालेल्या सिकंदर याने धारदार शस्त्राने सम्राट यांच्यावर सपासप वार केले. त्यातच गंभीररित्या जखमी होऊन सम्राट यांचा मृत्यू झाला. त्यानंतर निर्दयी सिकंदरने सम्राट यांचा मृतदेह फरफटत घराबाहेर आणला आणि तो रस्त्यावर फेकला. 

सिकंदर त्यानंतर परत घरीत आला. त्याने दरवाजा बंद केला व अंगावरील सर्व कपडे काढून तो जेवायला बसला. दरम्यान, रस्त्यावर मृतदेह बघून परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. एका नागरिकाने एमआयडीसी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच नागपूर एमआयडीसी पोलीस व गुन्हे शाखा पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. सम्राट यांच्या घराचा दरवाजा बंद होता. दरवाजा तोडून पोलीस घरात गेले असता सिकंदर हा विवस्त्र असल्याचे तसेच त्याच स्थितीत जेवत असल्याचे पाहून पोलीसही हादरले. 

दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सिकंदर हा मनोरुग्ण असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.