ज्वेलरी शॉप लुटण्याचा लुटारूंचा प्रयत्न फसला

November 26,2020

नागपूर : २६ नोव्हेंबर - चाकुच्या धाकावर ज्वेलरी शॉप लुटपाटीच्या दृष्टीकोणातून शॉपमध्ये पोहोचलेल्या लुटारूंचा प्रयत्न फसला. व्यापाराने धाडस आणि विवेक बुद्धीचा वापर केल्यामुळे लुटपाटीची मोठी घटना टळली. परंतु, आरोपींनी केलेल्या चाकू हल्ल्यात व्यापारी गंभीर जखमी झाले आहेत. वाठोडा पोलिस ठाणे हद्दीतील खरबी येथील ज्वेलरी शॉपमध्ये ही घटना घडली. पारूल राममनोहर थार्सेकर, असे जखमी व्यापार्याचे नाव आहे. 

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईबाबानगर, खरबी, नागपूर येथे राजेश उमारे यांच्या राहत्या घराच्या खाली पारूल राममनोहर थार्सेकर (वय ३२, रा. प्लॉट नं. ९0, भवानीनगर, शारदा चौक, नागपूर) यांचे थार्सेकर ज्वेलरी नावाचे शॉप आहे. वर्षभरापूर्वी त्यांनी हे शॉप उघडले. नियमितप्रमाणे त्यांनी मंगळवार, २४ नोव्हेंबर रोजी सकाळी १0 वाजता शॉप उघडले. दरम्यान, दुपारच्या सुमारास नोकर बाहेर गेल्यानंतर शॉपमध्ये ते एकटेच असताना दुपारी साडे चार वाजताच्या सुमारास अंदाजे २0 ते २५ वर्ष वयोगटातील दोन अनोळखी आरोपी दुकानात शिरले. त्यांनी 'चल निकाल चल निकाल म्हणत चोर म्हणून ओरडू नको असे धमकावले. ऐवढय़ातच एका आरोपीने त्याच्या जवळील चाकू काढत त्यांच्यावर हल्ला केला. थार्सेकर यांनी आरोपीने चाकु ने केलेला वार हाताने अडवला. त्यामुळे त्यांच्या तळहाताला जखम झाली. त्यानंतर आरोपीने त्यांच्या पोटावर वार केले. यात थार्सेकर हे गंभीर जखमी झाले. दरम्यान, दुसर्या आरोपीने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, थार्सेकर यांनी दुकानातील एका उंच खुर्चीवर उभे होऊन मदतीसाठी हाक दिली. ते वैभव.. वैभव म्हणून ओरडू लागले. थार्सेकरांचा आवाज बाहेरच्यांनी ऐकल्याचे कळताच बाहेर थांबलेल्या तिसर्या आरोपीच्या दुचाकी वाहनावरून आरोपी पळून गेले. याप्रकरणी वाठोडा पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.