भारत बंदच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी भामरागड तालुक्यात अडवली बस

November 26,2020

गडचिरोली : २६ नोव्हेंबर - देशभरात आज भारत बंदची करण्याचं आवाहन असतानाच महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात धक्कादायक बाब समोर आली आहे. संविधाना दिनी आणि भारत बंदच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली भामरागड तालुक्यातील लाहेरी-भामरागड मार्ग बंद पाडून नक्षलवाद्यांनी एसटी बस अडवली आहे.

या मार्गावर झाडे तोडून पीपल्स गुरील्ला आर्मी सप्ताह साजरा करण्याचे बॅनर्स नक्षलवाद्यांनी लावले आहेत. तसंच भारत बंदला पाठिंबा देत असून तो यशस्वी करणार असल्याचंही आवाहन फलकावर नक्षलवाद्यांनी लिहिलं आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

आलापल्लीहून लाहेरीकडे जाणारी बस रात्री उशिरा माओवाद्यांनी हिंदेवादा जवळ अडवली. बसमधील प्रवासी उतरून गेल्यानं ही बस रिकामी होती. या बसमध्ये केवळ चालक आणि कंडक्टर होते. दोघंही सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. माओवाद्यांनी झाडं तोडून ती रस्त्यावर अडवी टाकून ही निळ्या रंगाची बस अडवण्यात आली होती.

झाडावर लावलेल्या बॅनरमध्ये 26 नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय बंदला यशस्वी करण्याचे नक्षलवाद्यांकडून आवाहन करण्यात आले असून या मार्गावर झाडे तोडल्याने या मार्गावरील वाहतूक रात्रीपासून सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आली आहे. पोलीस आणि जवानांकडून या मार्गावरील झाडं हटवण्यात आली असून ज्यादा कुमक तैनात करण्यात आली आहे.