वीजबिल माफीसाठी अकोल्यात मनसेने काढला मोर्चा

November 26,2020

अकोला : २६ नोव्हेंबर - वीजबिल माफ करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. राज्य सरकार वीज बिल माफ करीत नाही, तोपर्यंत मनसे आंदोलन करणारच, असा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. मात्र, हा मोर्चा काढताना मनसे पदाधिकाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविला.

जिल्ह्यातील शेतकरी, घरगुती वीज ग्राहक यांचे वीजबिल माफ करावे ही मागणी राज्य शासनाने मान्य केल्यानंतर आपला शब्द फिरविला. त्यामुळे आता सामान्य नागरिकांना वीज माफीचा फायदा होणार नाही. यामुळे गोरगरिबांचे आर्थिक नुकसान होत आहे. हे सरकार सामान्य नागरिकांशी खेळ करीत असून ही बाब शेतकऱ्यांनाही अडचणीत टाकणारी असल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

मोर्चादरम्यान मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. अनेकवेळा निवेदन देऊनही महावितरण कंपनी कोरोना काळातील वीजबिल माफीला तयार नाही. जोपर्यंत हे वीजबिल माफ केलं जाणार नाही, तोपर्यंत आणखी आक्रमकतेनं आंदोलनं सुरूच ठेऊ, असा इशारा मनसेकडून देण्यात आला. हा मोर्चा पंकज साबळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. या मोर्चात सौरभ भगत, राजेश काळे, ललित यावलकर, चंदू अग्रवाल, रणजित राठोड यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.