आता आंतरराष्ट्रीय विमानसेवा ३१ डिसेंबर पर्यंत बंद

November 26,2020

नवी दिल्ली : २६ नोव्हेंबर - देशभरात कोरोना व्हायरसचे  वाढते संक्रमण लक्षात घेता डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन ने भारतातील कमर्शिअल आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. आता ही सेवा बंद राहण्याची तारीख 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढवण्यात आली आहे. अर्थात 31 डिसेंबरपर्यंत देशातील कोणतेही व्यावसायिक आंतरराष्ट्रीय विमान भारताबाहेर जाणार नाही किंवा दुसर्या देशातूनही भारतात येणारही नाही.

दरम्यान या कालावधीमध्ये वंदे भारत मिशनअंतर्गत  उड्डाण भरणारी विमानं सुरू राहणार आहेत. याआधी DGCA ने आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याचे आदेश दिले होते. यावर्षी 23 मार्चपासून व्यावसायिक आंतरराष्ट्रीय उड्डाणं बंद केले आहेत. त्यावेळी देशांतर्गत विमानसेवा देखील बंद करण्यात आली होती. मात्र 25 मे पासून देशांतर्गत उड्डाणे पुन्हा सुरू करण्यात आली.

मे महिन्यापासून 'वंदे भारत मिशन'अंतर्गत आणि जुलै महिन्यापासून 'द्विपक्षीय एअर बबल' करारांअंतर्गत काही देशातील विशेष आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. भारताने जवळपास 18 देशांबरोबर 'एअर बबल' करार केला आहे. देशांतर्गत विमानसेवा दोन महिन्यांपासून बंद राहिल्यानंतर 25 मे 2020 पासून पुन्हा एकदा सुरू करण्यात आली होती.