सात वर्षीय बालकाला चाकूने केले जखमी

November 26,2020

चंद्रपूर : २६ नोव्हेंबर - घुग्गुस येथून जवळच असलेल्या नकोडा येथील अरूणा सफर्जित पासवान (२९) ही महिला घरी नसताना  आरोपी हरिदास बबन वानखेडे रा. नकोडा यानेसाडेदहा वाजताच्या दरम्यान महिलेच्या घरात घुसून शिवीगाळ करून  हातावर चाकूने वार केला. यावेळी त्याने घरात असलेल्या सात वर्षीय बालकाच्या गालावरही चाकूने वार करून जखमी केले. 

अचानक झालेल्या या हल्ल्याने घाबरलेल्या महिलेने आरडाओरड सुरु केली. त्यामुळे आरोपीने तेथून पळ काढला. यावेळी परिसरातील नागरिकांनी  घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना माहिती दिली. जखमी अवस्थेत बालकाला व महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हल्ला  करून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दोन दिवसांपूर्वी आरोपी हरिदास  वानखेडे याने आपल्या  आईसोबत भांडण केले होते. अरुणा पासवान या त्यांच्या घराशेजारीच राहत असल्याने तिने मध्यस्ती करून  भांडण सोडवून हरिदासच्या आईला आपल्या घरी ठेवले होते. हाच राग मनात धरून हरिदास वानखेडे  याने अरुणाच्या सात वर्षीय बालकावर व तिच्यावर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले.