राज्यातील महाआघाडी सरकार लवकरच पडणार - गिरीश महाजन
November 26,2020
जळगाव : २६ नोव्हेंबर - राज्यातील सरकारमध्ये फार काही आलबेल नाही, ते पाच वर्ष पूर्ण करणार नाही, लवकरच त्यांच्या कर्माने पडणारच आहे, परंतु उगाचच केंद्राच्या नावाने आरडाओरड करीत असल्याचा आरोप भाजपचे नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केला.
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडी ची कारवाई झाल्यानंतर राज्यातील सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केंद्रावर आरोप केला आहे. याला उत्तर देताना गिरीश महाजन म्हणाले, की सध्या सीबीआय, ईडी, यांनी राज्यात सत्ताधारी पक्षातील कुणावरही कारवाई केली तर केंद्राने राज्यातील सरकारवर दबाव आणण्यासाठी कारवाई केली, असा आरोप राज्यातील महाविकास आघाडीच्या घटकपक्षांकडून होत आहे. कोणतीही कारवाई झाली की यांना उठसूट केंद्रातील भाजपचे सरकार दिसते.
राज्यातील सरकार पाडण्यासाठी केंद्रातील भाजप सरकार काहीही करत नाही, सत्ताधारी पक्षातील लोकांनी चुका केल्या असतील, तर त्यांच्यावर संबंधित संस्थांनी कारवाई करायची नाही काय? त्यांनी चुका केल्या नसतील तर त्यांना घाबरायचीही काही गरज नाही. परंतु उगाच केंद्रातील भाजप सरकारच्या नावाने शंख करणे बंद करावे.