मुंबईत १८ कोटी रुपयांचे कोकिन जप्त

November 26,2020

मुंबई : २६ नोव्हेंबर - मुंबईत बॉलिवूडमधील ड्रग कनेक्शन मोठ्या प्रमाणात समोर येत असताना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून धडक कारवाई करण्यात येत आहे. त्यात मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी महसूल गुप्तवार्ता संचलनालयाच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे. एक ड्रग स्मगलर अटक करण्यात आलं आहे. आरोपीकडून 18 कोटी रुपये किंमतीचं कोकीन देखील हस्तहत करण्यात आलं आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव मूसा असून तो पश्चिम आफ्रिकेतील देश गिनी येथील रहिवासी आहे. तो ड्रग स्मगलर आहे. आरोपी दुबईहून मुंबईत आला आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे. ट्रॉली बॅगच्या पोकळीत हे कोकीन लपवून आणलं होतं.

महसूल गुप्तवार्ता संचलनालयाच्या  अधिकाऱ्यांना याबाबत गोपनिय माहिती मिळाली होती. त्यानुसार दुबईहून मुंबईत आलेल्या मूसा याला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी ड्रग स्मगलर मूसाकडून 2 किलो 935 ग्रॅम कोकीन जप्त केलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या कोकीनची किंमत 18 कोटी रुपयांच्या घरात आहे.

दरम्यान, डीआरआरच्या अधिकाऱ्यांची एका आठवड्यातील ही दुसरी मोठी कारवाई आहे. गेल्या 10 दिवसांपूर्वी डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी सुमारे साडे चार किलो कोकीन जप्त केली होती. त्याचे आंतरराष्ट्रीय बाजारात 27 कोटी रुपये मुल्य होतं.

डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, एका आठवड्यात मुंबईत ही दुसरी कारवाई आहे. याचा अर्थ असा की, मुंबईत कोकीनची मागणी वाढली आहे. त्यामुळे डीआरआयनं आता ड्रग नेक्सेसपर्यंत पोहोचण्यासाठी रणनीती आखली आहे.

दरम्यान,  शनिवारी नवी दिल्ली रेल्वे स्थानकात 840 विदेशी बियरच्या कॅनची तस्करी केल्याच्या आरोपाखाली 49 वर्षीय नायजेरियन महिलेला अटक करण्यात आली आहे.

देशाची राजधानी दिल्लीत मोठ्या प्रमाणात कोकीनसह एका विदेश महिला प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. कस्टम विभागाने रविवारी दिल्ली विमानतळावरून परदेशी प्रवाशाला अटक केली आहे. प्रवाशाकडून जप्त करण्यात आलेल्या कोकीनची किंमत जवळपास 6 कोटी रुपये असल्याचं कस्टम विभागाकडून सांगण्यात आलं आहे. विदेशी प्रवासी, टांझानियाच्या अदिस अबाबाहून दिल्लीकडे येत असल्याची माहिती आहे. कस्टम विभागाकडून त्याला विमानतळावरच अटक करण्यात आली.