पंतप्रधानांना पुण्यात अडवणार मराठ्यांचा ठोक मोर्चा

November 26,2020

मुंबई : २६ नोव्हेंबर - पंतप्रधान नरेंद्र मोदी  हे येत्या शनिवारी 28 नोव्हेंबरला पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान या दौऱ्यात पुण्यातीस सीरम इन्स्टिट्युटला भेट देणार आहेत. कोरोना लसीच्या निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया ते समजून घेणार आहेत.

दुसरीकडे, मात्र या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती ठोक मोर्चानं  मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मार्ग अडवणार आहेत, अशी माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील  यांनी दिली आहे.

आबासाहेब पाटील म्हणाले, पुणे दौऱ्यावर येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अडवून मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून एल्गार करण्यात येणार आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार आणि केंद्र सरकार गंभीर नसल्याचा आरोप आबासाहेब पाटील यांनी केला आहे.

मराठा समाजाला राज्याच्या आणि केंद्राच्याही सुविधा मिळत नाही आहेत. मराठा विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय कधीपर्यंत सहन करणार? शासकीय सेवेत आणि शिक्षणात मराठा समाजाला डावललं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना लसीचा आढावा घेण्यासाठी पुण्यात येत आहेत. त्यावेळी त्यांनी मराठा समाजाच्या व्यथा समजून घ्याव्यात, मराठा समाजाचा आढावा घ्यावा, म्हणून मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने पुण्यात मोदींचा मार्ग अडवून भेट घेणार असल्याचं आबासाहेब पाटील यांनी जाहीर केलं आहे.

दरम्यान, पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी तयारी सुरू झाल्याचं अधिकृतपणे जाहीर केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानंतर चार डिसेंबरला 100 देशांचे राजदूत देखील सीरम इनस्टीट्युटला भेट देऊन तिथं सुरू असलेल्या कोरोना लसीच्या निर्मितीची प्रक्रिया समजून घेणार आहेत.