मेरे बाल काटे तो माई तुम्हारी कटिंग करुंगा - चिमुकल्याचा धमकीवजा इशारा

November 26,2020

नागपूर : २६ नोव्हेंबर - केस कर्तनालयामंध्ये  केस कापताना लहान मुले गोंधळ घालतांना आपण नेहमीच पाहतो. पण एक छोटास मालक आपले केस कापून घेतांना आपल्या बोबड्या भाषेत केस कपणाऱ्यालाच धमकी देतो  सध्या सोशल मीडियावर एका ‘चिडलेल्या’ चिमुकल्याचा व्हायरल व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. केस कर्तनालयामध्ये  केसांची बट कापल्यानंतर ‘अरे यार…!’ असं म्हणत हा चिमुकला लटका राग व्यक्त करतो, तेव्हा बघणाऱ्यांना त्याची दया आल्यावाचून राहत नाही. चंद्रपूरच्या चार वर्षीय अनुश्रुत पेटकरचा व्हिडीओ हजारो नेटिझन्सनी शेअर केला आहे. 

अनुश्रुतचे वडील अनुप पेटकर यांनी सलूनमध्ये हेअर कट होत असताना त्यांच्या लेकाचा व्हिडीओ कॅमेराबद्ध केला. सहज म्हणून आपल्या सोशल मीडियावर त्यांनी अनुश्रुत व्हिडीओ शेअर केला आणि त्याला लोकप्रियता मिळाली. “अरे बापरे क्या कर रहे हो तुम, मै गुस्सा हू, मै मारुंगा तुमको, मै तुम्हारी कटिंग करुंगा, मै बहुत बडा हू” असं गाल फुगवून, डोळ्यातून पाणी काढत बोलणारा अनुश्रुत चटकन मनात घर करतो.

चंद्रपूर शहरातील कोळसा खाणींचा भाग असलेल्या रय्यतवारी कॉलनी परिसरातील खाण कामगारांच्या वसाहतीत आपल्या कुटुंबासह राहणारा अनुश्रुत पेटकर सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्याच्या व्हिडीओत केस कापताना त्याला आलेला राग, त्याची हतबलता आणि गोबऱ्या गालामध्ये ठासून भरलेली निरागसता याचा सुरेख संगम झाला आहे.