दंड वसूल करुन आता बेजबाबदार नागरिकांना मनपा देईल मास्क

November 26,2020

नागपूर : २६ नोव्हेंबर -  मास्क शिवाय फिरणा-या बेजाबदार नागरिकांना नागपूर महानगरपालिका व्दारा ५०० रुपये दंड वसूल करुन मास्क देण्यात येत आहे. मनपा तर्फे या नागरिकांना निवेदन करण्यात येत आहे कि बाहेर फिरताना मास्क घाला आणि स्वत:चा व दूस-यांचा जीव धोक्यात घालू नका.

 मनपा आयुक्त  राधाकृष्णन बी यांनी नागरिकांच्या जीवन पध्दतीमध्ये सुधारणा करण्यासाठी दंड केल्यानंतर मास्क देण्याचे आदेश दिले आहे. या माध्यमातुन नागरिकांमध्ये मास्क लावण्याची वृत्ती निर्माण होईल. अति.आयुक्त राम जोशी यांनी सांगितले की मनपा तर्फे ही "गांधी गिरी" नागरिकांना चांगली सवय लावण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. कोव्हीड ला नियंत्रणात ठेवण्यासाठी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे आणि हात धुणे आवश्यक आहे. उपद्रव शोध पथकाचे जवान नागरिकांकडून दंड वसूल करुन मास्क देतील.  

 नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी आज  मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार १५९ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे ७९ हजार ५०० रुपयांचा  दंड  वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क सुध्दा देण्यात आले. मागील काही दिवसात शोध पथकांनी २१४७९ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. ९०,९८,५००/- चा दंड वसूल केला आहे.