अखेर शिवसेनेच्या निवेदनाची दखल घेत जलवाहिनीच्या अभियंतानी केली पाहणी

November 26,2020

नागपूर : २६ नोव्हेंबर - भंडारा जिल्ह्यातील  तुमसर नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरातील विविध ठिकाणी जलवाहिनीचे कामे करण्यात आली. तसेच सिमेंट रस्त्याच्या कडेला खड्डे खोदण्यात आले परंतु, खोदलेल्या रस्त्याच्या कडेला सिमेंट काँक्रीट टाकून रस्ता पूर्वरत करण्याची गरज असतांना दीड वर्षांपासून नागरिकांना रहदारीचा प्रश्न निर्माण झाला होता तसेच नगरपालिका व नगरसेवकांविरुद्ध प्रभागातील नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. याप्रकरणी शिवसेनेने नगरपालिकेच्या मुख्याधिकारी विजय देशमुख तथा कार्यालय अधिक्षक सुनीलकुमार साळुंखे यांना निवेदन दिले होते. परंतु, तुमसर नगरपालिकेने याप्रकरणाची दखल घेतली नव्हती त्यामुळे नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर शिवसेनेने पाच दिवस उपोषण करून नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले होते. परिणामी याप्रकरणी जलवाहिनीचे संबंधित कंत्राटदार देवराज कोंडेकर यांनी दखल घेऊन गुरुवारी पाणीपुरवठा विभागाचे अभियंता जय चिले, सुपरवायझर सुरेंद्र गौपाले यांनी प्रभाग क्रमांक 3 च्या हनुमान नगर येथील परिसरात पाहणी करून घेतले आणि पुढील तीन दिवसात रस्त्याच्या कडेला खोदलेले खड्डे सिमेंट काँक्रीट टाकून बुजविण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच. मेश्राम, उपजिल्हा संघटक जगदीश त्रिभुवनकर, विवेक देशमुख, स्वप्नील वैद्य, विकास बारई, सतीश वाकरकर, प्रशांत देशमुख, रोशन काळे, गजेंद्र बडवाईक सह प्रभागातील स्थानिक नागरिक उपस्थित होते.