महापौर निधीतून नागपुरात बनताहेत प्रसाधनगृह

November 26,2020

नागपूर : २६ नोव्हेंबर - नागपूर शहरात अनेक प्रसिद्ध बाजार आहेत. या ठिकाणी नेहमीच गर्दी होत असते. मात्र शहरात प्रसाधनगृहांची संख्या नगण्य आहे. यामुळे नागरिक आणि विशेषत: महिलांची कुचंबणा होते. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरासाठी ही अत्यंत खेदजनक बाब आहे. एकीकडे शहरात वेगाने विकास होत आहे. मात्र नागरिकांसाठी प्रसाधनगृह नसल्याने आपले शहर अस्वच्छ होत आहे. ही बाब अत्यंत गांभीर्याने स्वीकारून आणि त्यावर काहीशी कठोर भूमिका घेत महापौर पदाची शपथ घेताच संदीप जोशी यांनी संपूर्ण महापौर निधी हा केवळ शहरात प्रसाधनगृहांच्या निर्मितीकरीताच वापरला जाईल, असा निर्णय घेतला. विशेष म्हणजे या निर्णयाची अंमलबजावणीही झपाट्याने झाली आहे. आजघडीला नागपूर शहरात विविध ठिकाणी महापौर निधीतून प्रसाधनगृह बांधण्यात येत आहेत.

नागपूर शहर स्वच्छ, सुंदर दिसावे यासाठी अनेक प्रकल्प राबविण्यात येत आहेत. मात्र शहर स्वच्छ आणि सुंदर करताना नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देणे ही अत्यंत महत्वाची आणि आवश्यक बाब आहे. शहरात आवश्यक ठिकाणी प्रसाधनगृहांची व्यवस्था नाही. जिथे व्यवस्था आहे, तिथे त्यांची अवस्था चांगली नाही. परिणामी नागरिक उघड्यावर लघवी करून शहर विद्रुप करण्याचे काम करतात. यामध्ये महिलांची मोठी कुचंबणा होते. ही बाब लक्षात घेत महापौर संदीप जोशी यांनी आपला संपूर्ण महापौर निधी हा केवळ प्रसाधनगृहांच्याच निर्मितीसाठी वापरण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला.

निर्णय घेउन नागपूर महानगरपालिका प्रशासनाला निर्देश देउन मोकळे न होता. या कार्याचा त्यांनी पाठपुरवा सुरू ठेवला. विविध बैठका झाल्या. शहरातील गर्दीची ठिकाणे शोधण्यात आली. प्रसाधनगृहांची आवश्यकता असलेल्या ठिकाणांची माहिती मागविली. संबंधित ठिकाणी जागा उपलब्ध नसल्यास ती उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनाही सुचित करण्यात आले. या कार्यात येणारे अडथळेही तातडीने दूर करण्यात आले.