आयुर्विमा कर्मचाऱ्यांचा संप यशस्वी; सेवा विस्कळित

November 26,2020

नागपूर : २६ नोव्हेंबर - केंद्र  सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या विरोधात देशभरातील प्रमुख केंद्रीय कामगार संघटनांनी  पुकारलेला देशव्यापी सार्वत्रिक संप भारतीय आयुर्विमा महामंडळातील कर्मचाऱ्यांनी शंभर टक्के यशस्वी केल्याचा दावा आयुर्विमा महामंडळातील प्रमुख कामगार संघटना अखिल भारतीय विमा कर्मचारी असोसिएशन पश्र्चिम क्षेत्रीय अध्यक्ष अनिल ढोकपांडे यांनी आज येथे केला.

भारतीय आयुर्विमा मुख्यालयासमोर आज विमा कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.यावेळी झालेल्या व्दारसभेला अनिल ढोकपांडे, रमेश पाटणे,टि.के. चक्रवर्ती,नेहा मोटे इ.कामगार नेत्यांनी आपआपल्या भाषणातून भारत सरकारच्या कामगारविरोधी-शेतकरीविरोधी धोरणांवर जोरदार टीका केली.सभेच्या अध्यक्षस्थानी नागपुर विभागीय आयुर्विमा कर्मचारी युनियनच्या अध्यक्षा सौ नेहा मोटे होत्या.    भारतीय आयुर्विमा महामंडळाचे भागभांडवल शेयरबाजारात विकू नका, सार्वजनिक उद्योगांचे अंधाधुंद खासगीकरण थांबवा, राष्ट्रीय पेंशन योजना रद्द करुन १९९५ची जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करा, सुधारित वेतनश्रेणी त्वरित लागू करा, कामगारांनी प्रदीर्घ संघर्षातून मिळविलेले अधिकार संपुष्टात आणणारे कामगारविरोधी चार लेबर कोड बिल आणि तीन शेतकरीविरोधी कायदे त्वरित मागे घ्या, असंघटित क्षेत्रातील कामगारांना किमान वेतन रु.२१००० व सामाजिक सुरक्षा प्रदान करा इ. मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी संपक-यांनी जोरदार घोषणाबाजी केली.या संपामुळे आयुर्विमा महामंडळातील विभागीय कार्यालयात व सर्व शाखांमध्ये रोखीच्या व्यवहारासह सर्व कामकाज ठप्प झाले होते.

यावेळी आयुर्विमा कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.यशस्वीतेसाठी सर्वश्री वाय.आर.राव, शिवा निमजे, नेहा मोटे, नरेश अडचुले, अभय पांडे, अभय पाटणे, राजेश विश्वकर्मा, जी.हरी शर्मा इ.नी सहकार्य केले.