अमरावतीत वाळू तस्करांचा धुमाकूळ

November 29,2020

अमरावती : २९ नोव्हेंबर - शासनाने बांधकाम साहित्य पुरवणार्या व्यावसायिकासाठी वाळूघाट मोकळे न केल्याने रेती तस्कर नवीन शक्कल लढवून नदीपात्रातील वाळू लंपास करून महसूल प्रशासनास लाखो रुपयांचा चुना लावत आहे. काहीसा असाच अफलातून प्रकार अंजनगाव शहराच्या मधोमध वाहणार्या शहानुर नदीपात्रात घडल्याचे दिसून आले आहे. शहराला लागून असलेल्या दत्तघाटाजवळ खेल बाबूजी शेत सर्व्हे क्र. 3 जवळील प्रवीण शेंडे यांच्या शेता लगत असणार्या नदीच्या काठावर किमान पन्नास फूट लांब भुयार खोदण्यात आले असून त्यातील रेती चोरांनी चोरून नेली. सदर शेत अत्याधिक धोक्याच्या वळणावर असून शेतीचा काठ कधीही खचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भविष्यात पाण्याचा प्रवाह संबंधित शेतकर्याच्या शेतातून वाहण्याची शक्यता नाकारता येत नाही. तशी सूचना तलाठी व स्थानिक पोलिसांना त्यांनी दिली आहे. तलाठ्याने पाहणी केली असून पुढे कारवाई मात्र शून्य आहे.

स्थानिक महसूल प्रशासनाच्या कृृृपेने शहानूर नदीपात्र रेतीचोरांसाठी सोन्याचे अंडी देणारी कोंबडी ठरले असून नदीपात्रात रेती चोरट्यांनी ठिकठिकाणी खड्डे खोदून ठेवलेले आहेत. शहानूर नदीपात्रात सद्य स्थितीत रेतीच शिल्लक नसून रेती पूर्णतः चोरी झाली आहे. आता नदी पात्रात खड्डे करून रेती उपसण्याचा धंदा सुरू आहे. मागील दिवसात त्या नदीपात्रात एका मुलाचा मृत्यू झाला होता. त्याच नदीपत्रात रेती तस्करांनी खोदलेल्या खड्ड्यामुळे कृत्रिम डोह तयार झाले. अशाच खोदलेल्या खड्ड्यात यंदा खोडगाव येथील नदीपात्रात दोन चुलतभावांचा मृत्यू झाला होता. नदीपात्राचे अवलोकन केले असता अनेक खड्डे नदीपात्रात अवैधरीत्या केलेले दिसतात. यावर स्थानिक प्रशासनाचे लक्ष नाही की महसूल प्रशासन हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे, हे न समजण्याजोगे कोडे आहे.

 त्यात आता भुयाराचा नवीनच प्रकार लक्षात आला. दिवसभर साळसुदपणे खोदकाम करून रात्रीचे वेळी ती खोदलेली वाळू मालवाहू ऑटोमार्फत वाहून नेल्या जाते. अशा प्रकारच्या चोरट्या धंद्यास शेवटी पाठबळ तरी कुणाचे, हा प्रश्न निर्माण होत आहे. शहानूर नदीपात्रात रेतीचोर भलेमोठे खड्डे करून रेती चोरून नेत असल्याबाबत तरुण भारतने वृत्त प्रकाशित केले. मात्र निद्रिस्त असणार्या स्थानिक प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. प्रतिनिधीने चौकशी केली असता संबंधिताना ठरल्याप्रमाणे मोबदला पोहचतो, अशी धक्कादायक माहिती मिळाली. एवढे मोठे भुयार खोदण्यावरून कुणालाच याची माहिती नसावी, यावरुन सबकुछ गोलमाल असल्याचे दिसते. जर खोदलेला बोगदा कोसळला तर त्यात वाळू उपसा करणार्यासह इतरांच्या जीवावर बेतणारे ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणताही दुःखद प्रसंग घडण्यापूर्वी हा धंदा बंद होणे गरजेचे आहे. नव्याने पदभार सांभाळणारे ता. दंडाधिकारी वाहुरवाघ काय कारवाई करतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.