इंटरमॉडेल स्टेशनसाठी सात हजार वृक्ष तोडले जाणार

November 29,2020

नागपूर : २९ नोव्हेंबर - अजनी येथील प्रस्तावित इंटरमॉडेल स्टेशनसाठी (आयएमएस) सात हजार वृक्ष तोडले जाणार असल्याचा दावा पर्यावरणप्रेमींनी केला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षांची कत्तल लक्षात घेता या प्रकल्पाला विरोध सुरू झाला आहे. याबाबत पहिल्यांदाच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) स्पष्टीकरण देत सात हजार नव्हे तर १ हजार ९४० वृक्ष पाडण्यात येणार असल्याची माहिती दिली.

आयएमएस हा प्रकल्प पर्यावरण प्रभाव मूल्यांकनाच्या अनुरूप राहणार आहे. दररोज तीन लाखांहून अधिक प्रवासी हाताळण्याची क्षमता असणाऱ्या प्रस्तावित इंटरमॉडेल स्टेशनच्या बांधकामासाठी भारतीय रेल्वेच्या ४४.४ एकर जागेचे भूसंपादन होणार आहे. रेल्वे, रस्ते, बस, खाजगी वाहने तसेच जलवाहतुकीची सुविधा उपलब्ध असेल. विविध वाहतूक मार्ग एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे रस्त्यांवरची वाहन कोंडी कमी होईल आणि प्रदूषण पातळीतही घट होईल, अशी अपेक्षा आहे. रेल्वे स्टेशनसहच आंतरराज्य बससेवा, मेट्रो टर्मिनल यांचीही सुविधा असेल. पुढील तीस वर्षांतील प्रवाशांची संख्या ध्यानात ठेवून हे स्टेशन उभारण्यात येणार आहेत. यात फूट ओव्हरब्रीज, सबवे, प्रतीक्षालय, शौचालय, विश्रामगृह, उपयोगी साहित्य भांडार, एस्केलेटर अशा सुविधा असतील. त्याचप्रमाणे विविध वस्तूंची दुकानेही असतील.

वनविभाग आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार जास्तीत जास्त वृक्षांचे पुन:रोपण करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या नागपूर आणि आसपासच्या जागांवर एनएचएआयमार्फत पंचेवीस हजार वृक्ष लावण्यात येणार आहेत, अशी माहिती एनएचएआयच्या विभागीय कार्यालयाने शनिवारी दिली.

इंटरमॉडेल स्टेशनमुळे २०५० पर्यंत १६,३१,७३७ लिटर इंधनाची बचत होईल. तसेच कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन कमी होणार आहे. या प्रकल्पामुळे गर्दी आणि प्रदूषण कमी होऊन पर्यावरणाचे संवर्धन होणार असल्याचा दावाही एनएचएआयने केला आहे.