सीबीआयचे ४ राज्यात छापे
November 29,2020
नवी दिल्ली : २९ नोव्हेंबर - देशाची सर्वोच्च तपास संस्था सीबीआयने चार राज्यांत जवळपास ४५ ठिकाण्यांवर एकाचवेळी छापा मारला आहे. कोळसा माफिया, भ्रष्टाचाराविरोधात सीबीआयने हा छापा मारला असून पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, झारखंड आणि बिहारमध्ये खळबळ उडाली आहे. महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पश्चिम बंगालच्या दौर्यावर असून काही महिन्यांत तिथे निवडणूक होऊ घातली आहे.
कोलकाता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी दीड वर्षांपूर्वी शारदा चिटफंड घोटाळ्यात छापा टाकण्यासाठी सीबीआयचे टीम गेली होती. मात्र, त्यांना कोलकाता पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तेव्हा प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रात्रभर आंदोलन करत राज्यात सीबीआयला कारवाईसाठी परवानगी काढून घेतली होती. आता विधानसभा निवडणुका जवळ आल्याने पुन्हा एकदा बंगालमधील वातावरण तापण्याची शक्यता आहे. ही कारवाई विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नसली तरीही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोलकात्यामध्ये असल्याने महत्वाची आहे. ही कारवाई अन्य तीन राज्यांतही सुरु आहे. यामध्ये ईस्टर्न कोलफील्ड्स, रेल्वे, सीआयएसएफच्या अधिकार््यांवर छापे टाकण्यात आले आहेत. या अधिकार्यांवर गुन्हेदेखील दाखल करण्यात आले आहेत.