देशातून चोरी गेलेली अन्नपूर्णा देवीची मूर्ती कॅनडामधून परत आणणार - नरेंद्र मोदी

November 29,2020

नवी दिल्ली : २९ नोव्हेंबर - आपल्या परंपरेतील अनेक अनमोल ठेवा आंतरराष्ट्रीय टोळ्यांचे शिकार होत राहिला आहे. अशीच एक १०० वर्षांपूर्वीची देवी अन्नपूर्णा देवीची मूर्ती भारतातून चोरून कॅनडामध्ये नेली गेली होती. ही मूर्ती पुन्हा भारतात येत आहे, ही भारतीयांसाठी गर्वाची गोष्ट आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ या कर्यक्रमातून दिली.

मोदी म्हणाले, “मी आज सर्वांशी एक खूशखबरी देत आहे. प्रत्येक भारतीयाला हे ऐकून गर्व वाटेल की, देवी अन्नपूर्णाची एक खूपच जुनी मूर्ती कॅनडातून भारतात परत येत आहे. ही मूर्ती सुमारे १०० वर्षांपूर्वी १९१३ रोजी वाराणसीतील एका मंदिरातून चोरून देशाबाहेर नेण्यात आली होती. मी कॅनडा सरकार आणि हे पुण्य कार्य यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचे आभार मानतो.”

“देवी अन्नपूर्णाच्या मूर्तीचा काशी शहराशी खूपच खास संबंध आहे. आता देवीची मूर्ती परत भारतात येणं आपल्या सर्वांसाठी सुखद आहे. देवी अन्नपूर्णाच्या मूर्तीसह आपल्या परंपरेतील अनेक अनमोल ठेवा आंतरराष्ट्रीय टोळ्यांचे शिकार झाला आहे. या टोळ्या आंतरराष्ट्रीय बाजारात या मूर्ती मोठ्या किंमतीत विकतात. आता यावर भारताकडून दावा करण्यात येत आहे. या मूर्ती भारतात आणण्यासाठी भारताने आपले प्रयत्न देखील वाढवण्यात आले आहेत. या प्रयत्नांमुळेच गेल्या काही वर्षात भारत अनेक मूर्ती आणि कलाकृती पुन्हा देशात आणण्यास यशस्वी ठरला आहे”, अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली.

“देवी अन्नपूर्णाची मूर्ती परत येण्याबरोबरच एक योगायोगही आहे की काही दिवसांपूर्वी जागतिक वारसा आठवडा पाळण्यात आला. हा संस्कृतीप्रेमींसाठी जुन्या काळात परत जाण्यासाठी, त्यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी एक संधी उपलब्ध करुन देतो. करोनाच्या कालखंडातही आपण यावेळी नव्या पद्धतीने हा आठवडा साजरा करताना पाहिलं आहे. संकटाच्या काळात संस्कृती कामी येते, संकटाशी निपटण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तंत्रज्ञानाच्या मदतीनेही संस्कृती एक भावनिक प्रेरणेसारखी काम करते”, असंही मोदी यावेळी म्हणाले.